
नगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा या दोन तालुक्यांतील सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱया उजनी धरणातील पाणीपातळी सध्या खालावते आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पिकांना फटका बसणार आहे. गेल्या वर्षी हे धरण 110 टक्के भरले होते.
उन्हाळ्यामुळे पाण्याची वाढती मागणी तसेच हवामान विभागाने यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली असल्याने उजनीतील पाणी यंदा घटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. गतवर्षीच्या पावसामुळे उजनी धरण 110 टक्के म्हणजेच पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, सध्या सर्वत्र पाण्याची वाढती मागणी आहे. त्यामुळे शेतीसाठी मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा उपसा सुरू असून, अनेक पाणी योजनांसाठी मोठय़ा प्रमाणावर पाणी खर्ची होत आहे. त्याशिवाय पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पाणीसाठय़ात घट होत आहे. सध्या धरणात एकूण 77.97 टीएमसी म्हणजेच 26.71 टक्के पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा 14.31 टीएमसी असून, गतवर्षी यावेळी हा साठा 20 टीएमसी होता. आणखी सुमारे दोन महिने हा साठा वापरायचा असल्याने जपून पाणी वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
धरणातील पाण्याची सद्यस्थिती
उजनी धरणात सध्या 77.97 टीएमसी पाणीसाठा आहे. परंतु, त्यात 14.31 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असल्याने व जून महिन्यात पाऊस लांबणीवर पडल्यास शेतकरी तसेच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. त्यातच धरणातून सध्या 4341 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
























































