
युक्रेन आणि रशियातील तणाव शिगेला पोहचला आहे. रशिया समर्थक बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ही तणावाची परिस्थिती लक्षात घेत हिंदुस्थानी दूतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना आणि हिंदुस्थानी नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनची राजधानी कीवमधील दूतावासाने तेथील हिंदुस्थानींच्या सुरक्षेसाठी अडव्हायझरी जारी केली आहे. युक्रेन आणि रशियामधील तणावाची परिस्थिती पाहता युक्रेनमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी आणि हिंदुस्थानी नागरिकांनी तातडीने देश सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांना मायदेशी परतण्यासाठी कमर्शियल फ्लाइट किंवा चार्टर फ्लाइट मिळू शकतात, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.
हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी चार्टर फ्लाइटच्या आपल्या कॉन्ट्रॅक्टरच्या संपर्कात राहवे, असेही दूतावासाने म्हटले आहे. तसेच परिस्थितीची माहिती आणि इतर काही तपशील किंवा मदत हवी असल्यास दूतावासाच्या वेबसाइट, ट्विटरवर संपर्क साधावा, असेही दूतावासाने म्हटले आहे.





























































