‘या’ दिवशी रशिया युक्रेनवर हल्ला करणार; अमेरिकेचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
biden-putin-killer

रशिया आणि युक्रेनमधील तणाव आता शिगेला पोहचला आहे. रशियाने तिन्ही बाजूंनी युक्रेनला घेरले आहे. त्यापार्श्वभूमीवर युक्रेनची राजधानी कीवमध्ये रणनीतीबाबतच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियाचे 1 लाख 30 सैन्य तैनात असल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. तसेच रशिया युक्रेनवर हल्ला कधी करून शकते, याबाबतही अमेरिकेने दावा केला आहे.

रशिया आणि युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी सुमारे एक तास फोनवर चर्चा केली. युक्रेनविरोधात सैन्य कारवाई केल्यास त्यातील धोके आणि संभाव्य परिस्थितीबाबतचा इशाराही दिला आहे. मात्र, रशिया आपल्या भूमिकेवर ठाम असून या चर्चेतून काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता आहे.

रशियाने युक्रेनला घेरण्यासाठी क्षेपणास्त्र, हवाई दल, नौदल आणि विशेष पथके तैनात केली आहेत. तसेच सीमाभागात रसद पुरवठाही सुरळित राहण्यासाठी तयारीही केली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. रशियाने काळ्या समुद्रात 6 लढाऊ जहाजेही तैनात केली आहेत. त्यामुळे समुद्रीमार्गे आणि जमीनीवरूनही रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे.

रशियाने आपल्या रणनीतीबाबत आणि युक्रेनवर हल्ला करण्याच्या योजनेबाबत गुप्तता पाळली आहे. मात्र, रशिया युक्रेनवर कधी हल्ला करणार याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने काढली आहे. आता अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा रशियाच्या हालचालींवर नजर ठेवत आहे. तसेच रशियाची रणनीती समजण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रशिया बुधवारी 16 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीत कधी तथ्य आहे, याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या आम्ही रशियाच्या हालाचालींवर लक्ष ठेवत असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी केली असताना अमेरिकेनेही रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास युक्रेनच्या संरक्षणासाठी अमेरिकेनेही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने मित्र देशांसह युक्रेनच्या संरक्षणासाठी उतरेल आणि रशियाला तेवढ्याच क्षमतेने प्रत्युत्तर दिले जाईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.