
संगमेश्वर तालुक्यातील उमरे प्रादेशिक योजनेवरील सतत पाईप लाईन फुटत असल्याने तीन वर्षांपूर्वी फणसवणे पूल ते अंत्रवली पूल ही सुमारे 700 मिटर लाईन बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी चार इंचाची एसडीपी पाईप लाईन टाकण्यात आली होती. हे काम स्थानिक माणसाला पोटठेकेदार पद्धतीने देण्यात आले होते. मात्र पाईपलाईन सतत नादुरुस्त होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
वास्तविक एसडीपी पाईपलाईन ही कमीत कमी दहा वर्षे तरी विनातक्रार चालायला हवी होती. मात्र त्या पोट ठेकेदाराने कमी दरजाचा पाईप वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या लाईनवर एक ते दोन दिवसाआड पाईप मधेच फुटत असल्याने पाईपलाईन सतत नादुरुस्त होत आहे. परिणामी ग्रामस्थाना भर पावसात पाणी पाणी करावे लागत आहे.
पुरेसे पाणी मिळत नसतानाही पाणीपट्टी मात्र भरावी लागत आहे. हे काम सुरू असतानाच ते काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. मात्र त्यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देवरुखच्या अभियांत्याने ठेकेदारचीच पाठराखण केल्याने आज त्याचे परिणाम येथील ग्रामस्थाना भोगावे लागत आहेत.
या योजनेवर आताही काही ठिकाणी खाजगी करणाच्या नावाखाली कामे चालू असून काही ठिकाणी एकही पैसा खर्च न करता तेथील योजनेची चाचणी करण्यात येणार असल्याचे पत्र पाणी पुरवठा विभाग देवरुख यांनी कळंबस्ते ग्रामपंचायतीला दिल्याने खळबळ उडाली आहे. जर त्या वाडीत काम केलेच नाही तर चाचणी कसली करणार? या विषयी माहिती घेण्यासाठी शाखा अभियंता यांना ग्राम पंचायत, कार्यालयात बोलावले असता ते येण्याचे टाळत असल्याने या कामावर काम न करताच पैसे खर्च तर पडले नाहीत ना? अशी शंका येऊ लागली आहे.
गेल्या चार वर्षात या योजनेवर देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली किती खर्च झाला? याची व त्या कामाच्या दर्ज्याची चौकशी करण्याचे निवेदन ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार शेखर निकम यांना लवकरच देणार असल्याचे कळंबस्ते ग्राम पंचायत सदस्य राजू पाटील यांनी स्पष्ट केले आहे.



























































