
कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात सप्तशृंगी माता मंदिराजवळ बुधवारी संशयावरून काकाने आपल्याच पुतणीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणीचे नाव नेहा संदीप कांबळे ( वय 21) आहे. रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेत आरोपी संतोष हरीभाऊ आरणे (26) याला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणी आधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी नेहा बाथरूमला असे सांगत बाहेर येऊन सौरभ नावाच्या तरुणासोबत अंधारात उभी राहून बोलत होती. तिचा काका संतोष याने हे पाहिले. पुतणी नेहा विवाहित असून रात्रीच्या अंधारा दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याने त्याला संशय आला आणि त्याच्या रागाचा पारा चढला. त्यानंतर त्याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने पुतणीवर वार करत तिची हत्या केली. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या नेहाला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत तरुणीची आई ज्योती नंदकिशोर आरणे ( वय 46) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पुढील तपास करीत आहेत.




























































