शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जमिनीखाली साकारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक महापौर बंगला परिसरात उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यावरण विभागासह सर्व विभागांच्या परवानग्या मिळाल्यानंतर आता या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी महापौर बंगल्याची जमीन स्मारक संस्थेला देण्यासाठी आज मुंबई महापालिका आणि बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त संस्थेदरम्यान महत्त्वपूर्ण करार झाला. महापौर बंगल्याच्या परिसरातील जमिनीखाली हे स्मारक उभारले जाणार आहे.

या कराराविषयीची माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. शासनाने महापौर बंगला व परिसरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यानुसार आज महापौर बंगला व परिसरातील जमिन बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक विश्वस्त संस्थेला भाडेतत्वावर देण्याबाबत आज करार करण्यात आला. महापौर बंगला ही ऐतिहासिक वास्तू आहे. तिला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता परिसरातील जमिनीखाली बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहे. या करारामुळे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्याला गती मिळणार आहे, असे सुभाष देसाई म्हणाले. या करार प्रक्रियेवेळी महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, प्रकल्पाचे समन्वयक सुधीर नाईक तसेच मुंबई महापालिका सचिक प्रकाश जेठे, उपायुक्त चंद्रशेखर चौरे, उपायुक्त पराग मसूरकर आदी उपस्थित होते.

– महापौर बंगला ही ऐतिहासिक वास्तू आहे. तिला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता परिसरातील जमिनीखाली बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहे.