
पुरातन चर्चची नगरी अशी ख्याती असलेल्या वसईतील 16 व्या शतकातील अवर लेडी ऑफ ग्रेस पॅथेड्रल चर्चला युनेस्को आशिया-पॅसिफिक मेरिट पुरस्कार जाहीर झाला आहे. बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारासाठी 16 देशांमधून 90 नामांकने आली होती. त्यातून दहा वास्तूंची निवड करण्यात आली. त्यात वसईच्या या 475 वर्षे जुन्या ऐतिहासिक पुरातन चर्चला जागतिक पातळीवर मानाचे पान मिळाले.
अवर लेडी ऑफ ग्रेस पॅथेड्रल हे चर्च आहे. पोर्तुगीजांच्या काळात या चर्चची स्थापना करण्यात आली होती. 2023-24 मध्ये चर्चचा जीर्णोद्धार करण्यात आला. यावेळी सुमारे 4.75 कोटी रुपयांचा निधी गोळा करून खर्च करण्यात आला. या चर्चच्या नूतनीकरणाचे वैशिष्टय़ म्हणजे सिमेंटचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने चुन्याचा वापर करून डागडुजी करण्यात आली आहे. मुंबईचे प्रसिद्ध वास्तुविशारद संस्था सवानी हेरिटेज कॉन्सर्व्हेशन, वसईतील गिरीज येथील सिक्वेरा फाईन आर्ट आणि स्थानिक कामगारांनी अंत्यत कुशलतेने चर्चच्या लाकडी गाभाऱ्यावर कोरीव काम केले आहे. यामुळे हा गाभारा भाविकांना आकर्षित करतो.
n 2000 सालापासून दरवर्षी युनेस्कोकडून सांस्कृतिक वारसा जपणार्या विविध देशांतील वास्तू, वसाहती आणि प्रकल्पांना आशिया-पॅसिफिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्काराला 25 वर्षे पूर्ण झाली असून आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील 10 उत्कृष्ट प्रकल्पांना त्यांच्या संवर्धन कार्यासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. ‘अॅवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन’ या पुरस्काराने जपानमधील ओडा येथील ‘इवामी गिन्झान ग्रंथालय’ संवर्धन प्रकल्प आणि चीनमधील शांघाय येथील ऐतिहासिक ‘सिहांग वेअरहाऊस’ संवर्धन प्रकल्प यांचा गौरव केला जाणार आहे.
अवर लेडी ऑफ ग्रेस पॅथेड्रलची या पुरस्कारासाठी निवड होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. युनेस्कोच्या पुरस्कारांमध्ये हे एकमेव प्रार्थनास्थळ आहे. चर्चचा हा सन्मान प्रत्येक हिंदुस्थानीसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.
n जॉन फर्गोस, फादर





























































