मुगलांशी संबधित शहरांची नावे बदला- भाजप मंत्र्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव प्रयागराज असे झाल्यानंतर बिहार आणि देशातील मुगलांशी संबधित शहरांची नावे बदलण्याची मागणी केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी केली आहे. बिहारमधील अनेक शहरांची नावे बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गिरीराज सिंह नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याच्या योगी सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आणि बिहारमधील बख्तियारपूरसह इतर शहरांची नावे बदलण्याची मागणी केली.

अलाहाबाद होणार ‘प्रयागराज’, उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाची मंजुरी

परकीय आक्रमकांनी आपल्या शहरांवर ताबा मिळवून त्यांची नावे बदलली. आता आमची सत्ता आल्याने आक्रमकांनी दिलेली नावे बदलून शहरांना त्यांची प्राचीन ओळख परत देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे गिरीराज सिंह यांनी सांगितले. बिहारला खिलजी आक्रमकांनी लुटले होते. बख्तियारपूरसह अनेक शहरांची नावे आजही त्यांच्याशी संबंधित आहेत. या शहरांची नावे बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या शहरांना त्यांची प्राचीन ओळख परत मिळवून देण्यासाठी देशातील मुगलांशी संबंधित शहरांची नावे बदलण्याची मागणी त्यांनी केली.

आपल्या देशातील नागरिक श्री रामाचे वंशज आहेत. आपण मुगलांचे वंशज नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संबधित शहरांची नावे बदलण्याची गरज आहे. अयोध्येत राम मंदिर अवश्य होईल आणि देशातील मुसलमानांच्या सहकार्यानेच ते उभारण्यात येईल असा विश्वास व्यक्त करत, जे राम मंदिराला विरोध करतील त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला.