डीएसकेंवरील धडा विद्यापीठाने अभ्यासक्रमातून वगळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुह्यात सध्या तुरुंगात असलेल्या दीपक सखाराम कुलकर्णी तथा डीएसके यांच्यावरील वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात असणारा धडा तूर्तास वगळण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले विद्यापीठाने घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाने काढल्याने सध्या धडय़ावरून होणाऱ्या वादावर पडदा पडला आहे.

बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्यावर विद्यापीठाच्या वाणिज्य प्रथम आणि तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात धडा आहे. ‘यशोगाथा’ या पुस्तकातही डीएसकेंवर एक प्रकरण आहे. यामध्ये त्यांचा संघर्ष, यश, प्रेरणा यांचा समावेश असून, प्रा. प्र. चिं. शेजवळकर हे त्याचे लेखक आहेत. त्यांनी समाजातील काही प्रतिष्ठत आणि प्रेरणादायी व्यक्तींवर लिहिले आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दाखल गुह्यात डीएसके सध्या येरवडय़ात आहेत. असे असताना त्यांच्यावरील धडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कसा? असा प्रश्न प्राध्यापक आणि काही विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला होता. हा धडा वगळण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर हा धडा वगळण्यात आला. डीएसके यांच्यावर खटला सुरू आहे. अनेक लेखकांनी तो काढून टाकण्याचे सुचविले होते. असे सांगून प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, पुस्तक तयार करणाऱ्यांनीही यंदाच्या अभ्यासक्रमातून तो बाजूला ठेवण्याची विनंती केल्याने सध्याची स्थिती बघता तो वगळण्यात आला आहे.