
राज्यातील अनोंदणी हॉटेल्सला औद्योगिक दर्जा देण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या निकषांची घोषण अखेर महाराष्ट्र पर्यटन विभागाने केली आहे. या नव्या निकषांत 50 अनिवार्य निकषांची घोषणा करण्यात आली असून या निकषांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी सुरु करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंडळाने जाहीर केले आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील 1 ते 5 तारांकित हॉटेल्सना औद्योगिक दर्जा देण्यात आला होता. त्यानुसार त्यांना अनेक सवलती देण्यात आल्या होत्या. याच धर्तीवर राज्यातील अनोंदणीकृत हॉटेल्सना औद्यगिक दर्जा देण्याचे विचाराधीन होते. त्यासाठी पर्यटन संचालनालयाचे संचालक धनजंय सावळकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्यांनी नव्या निकषांची घोषणा केली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाच्या समितीने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता केल्यानंतर औद्यगिक दर्जाच्या सवलतींच्या लाभ घेणे शक्य होणार आहे.
ग्रीन हॉटेल्ससाठी 43 निकष
महाराष्ट्र पर्यटन विभागाने ग्रीन हॉटेल्ससाठी निकष जाहीर केले आहेत. या 43 निकषांपैकी 10 मूलभूत निकषांची अंमलबजावणी केल्यास त्यांना ग्रीन हॉटेल्सचा दर्जा प्राप्त होणार आहे. यात कर्मचाऱयांना वार्षिक प्रशिक्षण, सांडपाणी निःस्सारण, कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकबंदी, पर्यावरणस्नेही उपक्रमाचा समावेश आहे.
नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या
तरी इच्छुक हॉटेल्स व्यावसायिकांनी https://docs.google.com/forms/d/102pqZqSVF_LkQWFYTCcIlIqGopWyf-MHiGjGRrJfFFw/viewform?edit_requested=true&pli=1&gxids=7628 भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विभागाने केले आहे.

























































