अतिवृष्टीची भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष, नगरच्या खरीप आढावा बैठकीत पालकमंत्री धारेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील शेतकऱयांना दोन वर्षांपासून अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसेच सात हजार शेतकऱयांना शेततळ्यांचे अनुदानही मिळालेले नसल्याचा मुद्दा काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी उपस्थित केला. त्यांचीच री ओढत मिंधे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सरकारविरोधात शेतकऱयांमध्ये रोष असल्याची कबुली दिली. या मुद्दय़ावरून त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह प्रशासनाला जाब विचारला.

नगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शनिवारी (दि. 6) खरीप आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूरमध्ये दोन गटांमध्ये अतिवृष्टी व अन्य ठिकाणी सततचा पाऊस झाला व त्याची या वर्षासह मागील वर्षाचीही अद्याप भरपाई मिळाली नाह़ा आमच्याकडे शेतकरी सातत्याने मागणी करीत आहेत, त्याचे काय? असा सवाल उपस्थित केला. मिंधे गटातील खासदार लोखंडे यांनीही त्याला दुजोरा देऊन जिह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याने शेतकऱयांचा रोष वाढत चालल्याची जाहीर कबुली दिली.

जिल्हाधिकारी सालीमठ यांनी नगर जिह्यासाठी 166 कोटी रुपयांचे अनुदान आलेले आहे, उर्वरित अनुदान येणे बाकी आहे. आम्ही सर्व अहवाल पाठविलेला आहे, असे सांगितले. त्यावर पालकमंत्री विखे यांनी निधी लवकरात लवकर येण्यासाठी आपण पाठपुरावा करण्याचे आदेश दिले.

‘मागेल त्याला शेततळे द्या’ असे सरकारने जाहीर केले होते. पण, अद्यापि नगर जिह्यात सात हजार शेतकऱयांना कागदाचे अनुदानच मिळाले नाही, असा मुद्दा लोखंडे व कानडे यांनी उपस्थित केला. यावेळी कृषी विभागाने आम्ही नियोजन करून यादीनुसार अनुदान देत आहोत, असे सांगितल़े दरम्यान, कानडे आणि लोखंडे यांनी मदत केव्हा देणार, असे जाहीर सांगा असे विचारल्यावर कोणीही त्यावर उत्तर दिले नाही. यावर पालकमंत्री विखे यांनी राज्यस्तरावर या संदर्भातील चर्चा झालेली आहे. लवकरच शेततळ्यासाठीचे सर्व कागद उपलब्ध होऊन त्याचे अनुदान मिळेल, असे सांगून वेळ मारून नेली.