
मुंबईत रात्रीच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने मुंबईत घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ झाली. अनेक भागात पाऊस सुरू झाल्यामुळे घरी परतणाऱ्या नोकरदारांना स्टेशनवर आसरा घ्यावा लागला. दरम्यान, हार्बर विस्कळीत झाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.
हवामान खात्याने महाराष्ट्रात काही भागात पावसाचा इशारा दिला होता. वाशीम, धुळे आदी भागात पावसाचा अंदाज देण्यात आला होता. मात्र सायंकाळी मुंबईच्या वरळीसह विविध ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.
मानसरोवर स्थानकाजवळ सायंकाळी 8.10 ते 9.03 पर्यंत ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने इथली वाहतूक तासापेक्षाही उशिराने धावत होती. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिथे दुरुस्ती काम हाती घेतल्यानंतर ही वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. पावसाने हार्बर मार्ग विस्कळीत केल्याने शेकडो प्रवाशांचे हाल झाले. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून पुढील तीन तास पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाबरोबरच जोराची हवा सुरू असल्याने हवेत गारवाही निर्माण झाला आहे. मुंबईच्या विविध भागात रात्री सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाचा शिडकावा सुरू होता.
























































