मोदींच्या विरोधात जवान तेजबहादूर यादव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। वाराणसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समाजवादी पार्टीने अखेरच्या दिवशी बदलला आहे. बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जवानांना मिळत असलेल्या निकृष्ट जेवणाबाबत आवाज उठविल्याच्या कारणावरून यादव यांना सेवेत बडतर्फ करण्यात आले होते.

पंतप्रधानांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहणार असल्याचे तेजबहादूर यादव यांनी जाहीर करत प्रचारालाही सुरुवात केली होती. सपाने येथून शालिनी यादव यांना आधी उमेदवारी जाहीर केली होती. त्या काँग्रेसचे माजी खासदार व राज्यसभा माजी उपसभापती श्यामलाल यादव यांच्या सून आहेत. त्यांच्याऐवजी आता सपाकडून तेजबहादूर यादव रिंगणात असतील. काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. याव्यतिरिक्त मोदी यांच्या विरोधात 111 जवान व एक निवृत्त न्यायाधीश निवडणूक लढवत आहेत.

अखिलेश यांची घेतली भेट

तेज बहादूर यांनी याआधी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. काही कारणांमुळे हा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर समाजवादी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली आहे. तेज बदाहूर यांचा अर्ज छाननीत वैध ठरल्यावर शालिनी या 2 मे रोजी आपला अर्ज मागे घेतील.

कोण आहे तेजबहादूर
जवानांना दिले जाणाऱया जेवणाचा दर्जा खराब असल्याचा एक व्हिडीओ शेअर केल्यापासून तेजबहादूर यादव हे नाव एक वर्षापासून चर्चेत आहे. त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला होता. यासंदर्भातील चौकशीनंतर त्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आणि त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.