
आईची निर्घृण हत्या आणि वडिलांना झालेली जन्मठेपेची शिक्षा अशा कौटुंबिक धक्क्यातून सावरण्यापूर्वीच, आधार देणाऱ्या मामांनीच दोन सख्ख्या बहिणींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षीय भाचीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि तिच्या 16 वर्षीय धाकट्या बहिणीची पैशांसाठी विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन नराधम मामांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिची लहान बहीण गेल्या वर्षी जून महिन्यात उन्हाळी सुट्ट्यांसाठी बरखेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपल्या मामांच्या गावी गेल्या होत्या. मात्र, याच काळात 3 जुलै रोजी त्यांच्या वडिलांनी आईची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. वडिलांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात धाडल्यानंतर दोन्ही मुलींचा ताबा त्यांच्या मामांकडे देण्यात आला. मात्र, ज्यांनी संरक्षण द्यायला हवे होते, त्याच नातेवाईकांनी या मुलींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबर महिन्यात तिच्या दोन्ही मामांनी लहान बहिणीला फसवून सोबत नेले. त्यानंतर ती बहीण परतलीच नाही. काही दिवसांनंतर पीडितेने मामांना फोनवर पैशांच्या व्यवहाराबाबत बोलताना ऐकले, तेव्हा त्यांना भीती वाटली की मामांनीच तिच्या 16 वर्षीय बहिणीला विकले आहे. धाकट्या बहिणीचा ठावठिकाणा अद्यापही समजू शकलेला नाही.
लहान बहिणीला दूर केल्यानंतर मामांनी आपला मोर्चा मोठ्या भाचीकडे वळवला. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पीडिता झोपलेली असताना एका मामाने तिच्या खोलीत शिरून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला, तर दुसरा मामा दाराबाहेर पहारा देत उभा होता. इतकेच नव्हे तर, या नराधमांनी तिला पोलीस अधीक्षक कार्यालयात नेऊन ‘मी स्वतःच्या मर्जीने माहेरी जात आहे’ असा व्हिडिओ जबाब नोंदवण्यासाठी दबाव टाकला. तसे न केल्यास बेपत्ता असलेल्या बहिणीला जीवे मारण्याची धमकीही तिला देण्यात आली. पीडितेने सुरुवातीला इतर नातेवाईकांकडे मदत मागितली, मात्र कोणीही पुढे न आल्याने अखेर तिने स्वतः हिंमत करून पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. बरखेराचे एसएचओ प्रमेंद्र कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या वयाची पडताळणी शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे केली जात असून ती अल्पवयीन असल्याचे सिद्ध होताच गुन्ह्यात ‘पॉक्सो’ कायद्याची कलमे वाढवण्यात येतील. पोलीस सध्या बेपत्ता असलेल्या लहान बहिणीचा शोध घेत असून दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.


























































