
नगर महानगरपालिकेतील कचरा घोटाळा संदर्भामध्ये तपास हा आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश येथील जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहे. दरम्यान आता या तपासामध्ये कोणाकोणाची नावे उघड होतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये नगर शहरात सर्वत्र कर्फ्यूसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना शहरातला कचरा संकलित करणार्या ठेकेदारानं लॉकडाऊनच्या काळात शेकडो टन कचरा गोळा झाल्याचं कागदोपत्री दाखवल्याचा आरोप होत आहे. यातून नगरच्या व्यापारी आणि नागरिकांच्या कररुपी महसूली उत्पन्नावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचं काम करण्यात आलं. मात्र या घोटाळ्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सहीने आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
याप्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी अॅडव्होकेट अभिजित पुप्पाल यांच्यामार्फत संभाजीनगर खंडपिठात याचिका दाखल केली होती. न्यायालयानं या घोटाळ्याचा तपास करण्याचे आदेश नगरच्या पोलीस यंत्रणेला दिले होते. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता
पोलीस अधिकारी मुजावर यांच्याकडे या घोटाळ्याच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली होता. म्हणावा असा तपास पूर्णत्वाला गेलेला नव्हता अनेक त्रुटी या तपासामध्ये आढळून आलेल्या होत्या. मात्र महापालिका प्रशासनाच्या अर्धवट कार्यपद्धतीमुळे या गुन्ह्याचा रखडल्याचं बोललं जातं आहे. कचरा संकलन घोटाळ्याचा तपास थंडावल्याचं निदर्शनास येताच शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक कातकाडे यांनी या घोटाळ्याची कागदपत्रं अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे पाठविली. अपर पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी सदरच्या कागदपत्रांची फाईल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविली. दरम्यान, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानं सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
नगर महापालिकेत यापूर्वी झालेल्या पथदिवे घोटाळ्याच्या तपासाचं नक्की काय झालं, या घोटाळ्यात किती अधिकार्यांचे हात बरबटले होते, हे नगरकरांना चांगल्यापैकी माहित आहे. त्यामुळे या कचरा संकलन घोटाळ्याला जबाबदार असलेल्या ठेकेदाराविरुध्द आता कठोर कारवाई करण्यात यावी, अशी माफक अपेक्षा नगरकरांमधून व्यक्त केली जात आहे.
नगरच्या महापालिकेत आतापर्यंत किती घोटाळे झाले, किती उघडकीला आले, याप्रकरणी किती जणांविरुध्द कठोर कारवाई झाली, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. निकृष्ट दर्जाचे रस्ते करून झालेला डांबर घोटाळा, निकृष्ट साहित्य वापरुन झालेला पथदिवे घोटाळा, ठेकेदाराला वेळोवेळी मुदतवाढ देऊन सुरु असलेला फेज टू चा घोटाळा, आताचा कचरा संकलन घोटाळा अशा या घोटाळ्यांची जी मालिका आहे.
दरम्यान, कचरा संकलन घोटाळा आणि या घोटाळ्याच्या तपासात नगर महापालिकेचे कोणकोणते ‘मोठे मासे’ अडकणार, या घोटाळ्याचा तपास वेगानं होईल का, या घोटाळ्याचा ‘मास्टरमाईंड’ नगरकरांसमोर येणार का, याकडे नगरकरांचं लक्ष लागलं आहे. संबंधित ठेकेदाराची माहिती पोलिसांनी अगोदर मागितले असून त्याच्या बँकेचा सुद्धा खाते उतारा मागितलेला आहे. पण पहिल्या खाते उतारा हा वेगळा असल्यामुळे त्यावेळेला पोलिसांनी बँकेला पुन्हा पत्र देऊन दुसरी माहिती मागवलेली आहे. आता हा तपास आर्थिक गुणाचे विभाग झाल्यामुळे कशा पद्धतीने तपास होतो आणि कोणाकोणाची नावे पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


























































