बलात्कारांमध्येही फरक असतो, योगींच्या मंत्र्याचे संतापजनक वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

अलिगढ येथे अडीच वर्षांच्या चिमुरडीच्या हत्येनंतर देशभर संतापाचा डोंब उसळला आहे. या हत्येनंतर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश इथेही लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण, देशभरात असं वातावरण असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका मंत्र्याने मात्र संतापजनक वक्तव्य केलं आहे. बलात्कारांमध्येही फरक असतो, असं या मंत्र्याने म्हटलं आहे.

या मंत्र्याचं नाव उपेंद्र तिवारी असं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार हा बलात्कार असू शकतो. मात्र, 30-35 वर्षांच्या प्रौढ विवाहित महिलेवर झालेला बलात्कार वेगळ्या प्रकारात मोडतो. काही जण पाच-सहा वर्षं एकत्र राहतात आणि त्यानंतर बलात्काराची तक्रार करतात, असं संतापजनक वक्तव्य तिवारी यांनी केलं आहे.

ट्विटरवर नेटकऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तिवारी यांचं वक्तव्यं हे विकृती आणि पुरुषी मानसिकतेचं उदाहरण असल्याची टीका ट्विटरवर करण्यात येत आहे.