अनिकेतने पालिकेच्या प्रशिक्षण केंद्रातून घेतले धडे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ठाणेकर असलेले अनिकेत हिरडे यांनी देशात 81वा रँक मिळवून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अनिकेत ठाण्यातील  टिकुजीनी वाडी परिसरात राहत असून मॉक इंटरव्हय़ूचे धडे त्यांनी ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये घेतले होते. अनिकेतच्या यशामुळे ठाणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 2023 परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला आहे. या वर्षी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट अ आणि गट ब मध्ये नियुक्तीसाठी एकूण 1016 नावांची शिफारस करण्यात आली आहे. चिंतामणराव प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमधील आणखी तीन जणांनी या परीक्षेत चमकदार कामगिरी केली असून ठाण्यातील वसंत विहार परिसरात राहणाऱया समीक्षा म्हेत्रे यांनी 302, नेरुळच्या वृषाली कांबळे यांनी 310वा तर ऐरोलीच्या डॉ. स्नेहल वाघमारे यांनी देशात 945वा रँक मिळवला आहे. त्यामुळे ठाण्याचे दोन तर नवी मुंबईच्या दोन विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

निकाल समजल्यानंतर आनंद झालाच. मी मूळचा ठाणेकर असून सर्व तयारी ही ठाण्यातूनच केली होती. मी आयपीएस महाराष्ट्र पॅडर असून हा माझा तिसरा प्रयत्न आयएससाठी होता जो यशस्वी झाला. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये मी गेल्या वर्षी मॉक इंटरव्हय़ूचे प्रशिक्षण घेतले होते. या ठिकाणी खूप तज्ञ अधिकाऱयांचे पॅनल होते ज्याचा चांगला फायदा झाला.

 n अनिकेत हिरडे

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱया परीक्षांना आणि इतर संलग्न परीक्षांना बसणाऱया विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच अशा पद्धतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे. सदर संस्थेतील आतापर्यंत एकूण 76 विद्यार्थीं/प्रशिक्षणार्थिनी स्पर्धा परीक्षेत आणि 400पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले आहे.