
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
ट्रम्प प्रशासनाने बुधवारी इराणकर नवे प्रतिबंध लावले. यामध्ये लोखंड, स्टील, ऍल्युमिनियम आणि तांब्याच्या निर्यातीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेच्या या प्रतिबंधांनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोखंड, स्टील, ऍल्युमिनियम आणि तांब्याची निर्यात बंद करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. नॉन पेट्रोलियम पदार्थानंतर इराणला सर्वाधिक महसूल या धातूंच्या निर्यातीतून मिळतो. त्यामुळे धातूंची निर्यात करून इराणचा महसूल कमी करणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य देशांनीही इराणकडून निर्यात होणाऱ्या या धातूंना आपल्या बंदरांवर उतरू देऊ नये, असेही ट्रम्प यांनी बजावले आहे.
लोखंड, स्टील, ऍल्युमिनियम आणि तांबे या धातूंच्या निर्यातीद्वारे मिळणारा पैसा इराणकडून हत्यारांची खरेदी, दहशतवादी गटांना मदत आणि सैन्य दलाचा विस्तार या कारणासाठी वापर केला जाऊ शकतो, असे ट्रम्प यांनी इराणविरोधातील आदेशात नमूद केले आहे. इराणने बुधवारी 2015 सालच्या आण्विक करारातील काही अटी मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर अमेरिकेने नवे निर्बंध लावण्याची घोषणा केली.
अमेरिकेने यापूर्वी काही देशांना इराणकडून कच्च्या तेलाची आयात करण्याची सूट दिली होती, परंतु गेल्याच महिन्यात अमेरिकेने यापुढे सूट देणार नसल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने मध्य-पूर्वेत आपल्या नौदलाला पाचारण केले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी इराणला इशारा दिला होता.
अमेरिका किंवा अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना हानी पोहचवण्याचा प्रयत्न केल्यास इराणला अमेरिकेला सामोरे जावे लागेल. आम्ही इराणबरोबर युद्ध करू इच्छित नाही, परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचेही बोल्टन यांनी स्पष्ट केले.
























































