पदाचा वापर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच करा -चंद्रकांत खैरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभय मिरजकर । लातूर

शिवसेना पक्षप्रमुखांनी आपणास शिवसेनेचे जे पद दिलेले आहे त्याचा वापर हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच झाला पाहिजे असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा लातूर जिल्ह्याचे संपर्कनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. चाकूर येथे अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील चाकूर आणि अहमदपूर तालूक्यातील पदाधिकाऱ्याच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने मजबुत संघनात्मक बांधणी झालीच पाहिजे. कोणत्याही पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करता कामा नये. आपले पद हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दिलेले आहे. सर्वांनी गट-तट सोडून एकत्रीतपणे काम करावे. प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा स्थापन झालीच पाहिजे. तालुकाप्रमुखांनी गावा गावात जाऊन पक्षाचे मजबूत संघटन करावे. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही यावेळी खासदार चंद्रकात खैरे यांनी दिला.

अच्छे दिनचा नारा देऊन सत्तेवर आलेल्या केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने वाढतच आहेत. महागाई वाढत चालली आहे, कुठे आहेत अच्छे दिन याचा जाब विचारावा असेही यावेळी त्यांनी म्हटले. कार्यक्रमास शिवसेनेचे आजी, माजी पदाधिकारी, शिवसैनिक, शाखाप्रमुख यांची उपस्थिती होती.