गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरण: चौकशी समिती १० ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
बीड गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणी चौकशी समितीने बीड च्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला, डॉ निलमताई गोऱ्हे, आमदार विद्याताई चव्हाण, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे, डॉ अशोक थोरात, डॉ आर बी पवार

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्ह्यामध्ये सामान्य कुटुंबातील महिलांना कॅन्सरची भीती दाखवून त्यांच्यावर गरज नसताना गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया करून गर्भाशय पिशव्या काढण्याच्या धक्कादायक प्रकाराने राज्य सरकार हादरून गेले. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक चौकशी समिती नेमली. आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी बीडमध्ये आपल्या समितीच्या कामकाजाला सुरूवात केली. १० ऑगस्टपर्यंत या समितीला अहवाल सरकारकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. २० वर्षे वयाच्या महिलांच्या सुद्धा गर्भाशयाच्या पिशव्या काढल्याचेही समोर आल्याचे त्यांनी सांगितले. या बाबी धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाच्या असल्याच्या त्या म्हणाल्या.

बीड जिल्ह्यामध्ये गर्भपाताच्या घटनांना आळा बसल्यानंतर गर्भाशयाच्या पिशव्या काढण्याच्या घटना घडू लागल्या. पाच वर्षामध्ये तब्बल दीड लाख महिलांच्या पिशव्या गायब झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कॅन्सरची भीती दाखवून सामान्य आणि असुशिक्षित महिलांच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया करून त्यांच्या गर्भाशयाच्या पिशव्या काढून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनानंतर हादरलेल्या सरकारने कारवाईला सुरूवात केली. विंधानसभेच्या अधिवेशनात डॉ.निलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी मांडली. यानंतर बीड जिल्ह्यातील गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. त्या समितीने आज बीडचा दौरा केला.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, आ.विद्याताई चव्हाण, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, डॉ.शिल्पा नाईक, उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर.पवार यांच्या पथकाने आज वंजारवाडी येंथे जावून गर्भाशयाच्या पिशव्या काढलेल्या महिलांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीनंतर विविध सामाजिक संघटना, कामगार संघटनांशी संवाद साधून आढावा घेण्यात आला. समितीने या सर्व घडामोडींचे सुक्ष्म निरीक्षण केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना समितीतील प्रमुख विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, नेमलेली समिती अभ्यास करून नियमावली तयार करेल. आपला अहवाल राज्य सरकारला १० ऑगस्टपर्यंत सादर करेल. गर्भाशय शस्त्रक्रियाचे प्रकरण केवळ बीड जिल्ह्यापुरते मर्यादीत नाही तर संपूर्ण राज्यभर अशा घटना घडत आहेत. २० वर्षाच्या महिलेला सुद्धा आपली गर्भाशयाची पिशवी गमवावी लागली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. कामगार आणि मुकादम यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. त्यानुसार साखर आयुक्तांना आम्ही सूचना दिल्या आहेत. ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याची काळजी घेवून त्यांच्या स्वच्छतागृहाबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. रूग्णालयांना सूचना देवून रूग्णांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे असेही डॉ.निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

बीडचा पॅटर्न राज्यात अंमलात येणार
गर्भाशयाच्या चुकीच्या शस्त्रक्रिया करून आपले खिसे भरून महिलांच्या गर्भाशयाच्या पिशव्या काढून टाकण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्याने महिला विकलांग होते. महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. ही समिती आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे. त्यानुसार नियमावली तयार केली जाणार आहे. एवढेच काय आर्युमंगलच्या धर्तीवर गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया रोखण्यासाठी प्रोग्राम तयार केला जाणार आहे. बीडमध्ये तयार करण्यात येणारा हा पॅटर्न राज्यभर अंमलात येणार आहे.

महिलांनी व्यक्त केल्या वेदना आणि भावना
डॉ.निलम गोऱ्हे यांनी वंजारवाडी येथील महिलांशी बंद रूममध्ये चर्चा केली. त्यानंतर ५० पेक्षा जास्त महिला समितीच्या सदस्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात आल्या. तेथेही बंद रूममध्ये महिलांशी संवाद साधला. ज्या महिलांच्या गर्भाशयाच्या पिशव्या चुकीच्या पद्धतीने काढून टाकण्यात आल्या. त्या महिलांनी आपल्या व्यथा, वेदना आणि भावना समितीसमोर व्यक्त केल्या. असुशिक्षितपणाचा कसा गैरफायदा घेतला गेला हे स्पष्ट शब्दात सांगितले गेले.