ज्योती मल्होत्रानंतर आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक, ISI ला पाठवत होता गोपनीय माहिती

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) रविवारी एका मोठ्या कारवाईत रामपूर येथील रहिवासी असलेल्या शहजाद या व्यक्तीला मुरादाबादमधून अटक केली. शहजादवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. त्याने गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, शहजाद हा बराच काळ पाकिस्तानच्या संपर्कात होता. तो अनेकवेळा पाकिस्तानात जाऊन आला आहे. देशातील काही स्लीपर सेल्सना आर्थिक मदत पुरवण्यातही त्याचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. ही अटक पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात वाढलेल्या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. दरम्यान, याआधी हरयाणा येथील युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत पंजाब आणि हरयाणातील मालेरकोटला येथून एकूण 6 पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे.