
सामना ऑनलाईन । बदायू
उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी पक्ष भाजपच्या अडचणी कमी होण्याचे नाव नाही. भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्यानंतर आणखी एका आमदारावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. भाजप आमदार कुशाग्र सागर यांच्यावर मोलकरणीने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदायू जिल्ह्यातील बिसौली विधानसभा क्षेत्रातील भाजप आमदार कुशाग्र सागर यांच्यावर मोलकरणीच्या मुलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून भाजप आमदाराने आपल्या मुलीसोबत गेल्या दोन वर्षापासून शारीरिक संबंध ठेवले असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. पीडितेने आमदाराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पीडितने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, कुशाग्र सागर यांचे वडील योगेंद्र सागर (माजी आमदार) यांनी मी लग्नायोग्य झाल्यानंतर आपल्या मुलाचे लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. अल्पवयीन असताना कुशाग्र सागरने पहिल्यांदा माझ्यावर बलात्कार केला होता. कुशाग्र यांचे लग्न एका दुसऱ्या मुलीसोबत ठरले आहे. १७ जूनला त्यांचे लग्न होणार आहे. परंतु त्यांनी माझ्यासोबत लग्न न केल्यास मी आत्महत्या करेल, अशी धमकी पीडितेने दिली आहे. तसेच आमदाराने पीडितेला २० लाख देण्याचे आमिष दाखवत हे प्रकरण पैशांखाली दडपून टाकण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप पीडित तरुणीने केला. पीडितेच्या आरोपानंतर आमदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे. तपासाअंती आमदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.






















































