कोविड रुग्णाच्या जिवाशी खेळणारे दोघे गजाआड, दीड कोटीची बनावट औषधे केली जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणारे फेविपीरावीर हे बनावट औषध तयार करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱया दोघांना समतानगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. सुदीप मुखर्जी आणि संदीप मिश्रा अशी त्या दोघांची नावे आहेत. संदीप हा उत्तर प्रदेशमध्ये ती बनावट औषधे बनवून सुदीपला नोएडा येथे पाठवत असायचा.

कांदिवली आणि गोरेगाव परिसरात काही औषध विव्रेत्यांकडे फेविपीरावीर औषधाचा साठा असल्याची माहिती एफडीएला मिळाली. त्या माहितीनंतर सहआयुक्त (दक्षता) समाधान पवार यांच्या पथकाने गोरेगाव आणि कांदिवलीत छापा टाकला. छापा टाकून सुमारे दीड कोटी रुपयांची बनावट औषधे जप्त केली. एफडीएच्या अधिकाऱयांनी ती औषधे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱयांनी औषधाच्या बॉक्सवर असलेल्या कंपनीची माहिती काढली. माहिती काढल्यावर हिमाचलच्या ड्रग्ज कंट्रोलर यांच्याशी संपर्क साधला असता त्या नावाची कंपनी हिमाचल येथे नसल्याचे एफडीए अधिकाऱयांना सांगण्यात आले.

एफडीएचे औषध विक्रेत्याची चौकशी केली असता त्याच्या चौकशीत सुदीप मुखर्जीचे नाव समोर आले. सुदीपला एफडीएने चौकशीसाठी बोलावले तेव्हा त्याने ती औषधे उत्तर प्रदेश येथील संदीप मिश्राने बनवून दिल्याचे सुदीपने एफडीएच्या अधिकाऱयांना सांगितले. बनावट औषधप्रकरणी एफडीएने दिलेल्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी सुदीपविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. सुदीपच्या चौकशीत संदीपचे नाव समोर आले. संदीपच्या अटकेसाठी समतानगर पोलिसांचे पथक मेरठला गेले होते. तेथून संदीपला अटक करून मुंबईत आणण्यात आले. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उत्तर प्रदेशात बनायची बनावट औषधे

संदीप हा मेरठ येथे त्याच्या लॅबमध्ये ती बनावट औषधे बनवत असायचा. बनावट औषधे तो नोएडा येथे सुदीपला पाठवायचा. त्यानंतर सुदीप ती औषध बॉक्समध्ये पॅक करून मुंबईला पाठवत होता. संदीप हा खरा शास्त्रज्ञ होता की मुन्नाभाई होता त्याचा तपास पोलीस करत आहेत. त्याला ती औषधे बनवण्यास कोणी सांगितली, ती बनावट औषधे बनवण्यास तो कोणाची मदत घेत होता, त्याने आतापर्यंत किती औषधे मुंबईसह राज्यात पाठवली आहे याचा तपास समतानगर पोलीस करत आहेत.