
आई वडिलांवर नाराज होऊन घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या प्रकरणातील आरोपी सफाई कर्मचारी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या इटावा येथे ही घटना घडली आहे. पीडिता ही दहावीची विद्यार्थिनी असून ती मूळची झाशीची रहिवासी आहे. तिला तिच्या आईवडिलांचा ओरडा पडला होता. त्या ओरड्यामुळे नाराज झालेल्या पीडितेने घरातून पळून जायचं ठरवलं. तिला आपल्या आजोबांच्या घरी महोबा येथे जायचं होतं. ती चुकून झाशी-इटावा इंटरसिटी गाडीत बसली. ती इटावाला पोहोचली तेव्हा रात्रीचे साडे दहा वाजले होते. त्यामुळे ती गोंधळली.
अनोळखी शहरात पोहचल्यामुळे गोंधळलेली पीडिता तिथेच बसून राहिली. त्यावेळी बोगीची सफाई करण्यासाठी आलेला कर्मचारी तिथे आला. त्याने तिला एकटीला पाहून तिची चौकशी करायला सुरुवात केली. त्याने तिच्याकडून सगळी माहिती काढून घेतली. तिने त्याच्या फोनवरून तिच्या आईला फोन करून आपण इटावा येथे आल्याचं सांगितलं. त्यानेही तिच्या आईशी बोलून ती सुरक्षित असल्याचं सांगितलं आणि सकाळ होताच तिला घेऊन जाण्यास सांगितलं.
त्यानंतर त्याने ट्रेनच्या बोगीला कुलूप लावलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिथून फरार झाला. सकाळ झाल्यानंतर पीडितेने एका प्रवाश्याकडून फोन घेऊन घरी फोन केला. फोनवरून तिने सगळी हकिगत आईला सांगितली. तिचे कुटुंबीय इटाव्याला पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी पाच तासांत आरोपी राजकपूर यादव याला अटक केली.



























































