
“निवडणुका जवळ आल्या की भाजप केवळ उद्घाटनांचा धडाका लावते, पण प्रत्यक्षात त्या सुविधा जनतेच्या कामाला येत नाहीत. पंतप्रधानांनी थाटामाटात ७ विमानतळांचे उद्घाटन केले होते. परंतु सत्य हे आहे की, त्यातील ६ विमानतळ आता बंद पडले आहेत,” अशा बोचऱ्या शब्दांत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशमधील दादरी येथे आयोजित एका भव्य जनसभेला संबोधित करताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
अखिलेश यादव यांनी जेवर (नोएडा) आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले. ते म्हणाले की, या विमानतळासाठी आवश्यक असलेल्या एनओसी (NOC) मिळवण्याचे महत्त्वाचे काम समाजवादी पक्षाच्या सरकारनेच केले होते. मात्र भाजप आता अर्ध्या-अधुऱ्या प्रकल्पांचे श्रेय घेण्यासाठी घाई करत आहे. “भाजपला विमानतळ चालवण्यात रस नाही, तर त्यांना केवळ त्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांच्या माध्यमातून मोठी कमाई करून द्यायची आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
भाजपच्या रॅलीवर टीका करताना अखिलेश म्हणाले की, सत्ताधारी पक्षाच्या सभांना लोक स्वतःहून येत नाहीत, तर त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून आणले जाते. विद्यार्थ्यांना सुट्टीचे आमिष दाखवून आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणून गर्दी जमवली जाते, पण कॅमेऱ्यासमोर त्यांची ही पोलखोल झाली आहे, असे ते म्हणाले.
























































