
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भीषण अपघात झाला आहे. उत्तरकाशीतील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ एक प्रवासी बस दरीत कोसळली. अपघातावेळी बसमध्ये 35 प्रवासी होते, त्यापैकी किमान 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 27 प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमधील भआविक गंगोत्रीचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
बसमधील सर्व प्रवासी गुजरातचे रहिवासी आहेत. यात्रेकरुंनी भरलेली ही बस गंगोत्रीहून प्रवास करुन परतत असताना वाटेत त्यांचा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकाने प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 27 जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. उत्तरकाशी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलीस अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकारीही घटनास्थळी हजर आहेत. अपघाताबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘गंगोत्री उत्तरकाशीकडून येणाऱ्या प्रवासी बसचा गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गंगनानीजवळ अपघात झाला. गाडीत सुमारे 35 जण होते. 27 जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





























































