
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एका रिक्षाचालकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील नावाच्या या रिक्षाचालकाच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सुनील रिक्षा चालवायचे. मात्र वाहतूक पोलिसांनी काही कारणास्तव त्यांना दंड ठोठावला होता. त्यामुळे ते अनेक दिवस तणावाखाली होते. या तणावामुळे अखेर त्यांनी गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले. कानपूर आऊटरमधील नरवाल येथे ही घटना घडली आहे. सुनील यांनी राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांनी आत्महत्येचे कारण सांगितल्याने सर्वांना धक्काच बसला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नरवाल येथील रहिवासी सुनील गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी 1 सेकंड हँड रिक्षा खरेदी केली होती. रिक्षाच्या कमाईवर ते त्यांचे घर सांभाळत असत. त्यांच्या पश्चात पत्नी संगीता आणि 4 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, 30 जुलै रोजी सुनील यांना 10,000 रुपयांच्या ई-ट्राफिक चलानचा मेसेज आला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दंडाची रक्कम भरण्यासाठी ते पैसे गोळा करत होते. असे असतानाच 4 सप्टेंबर रोजी पुन्हा 12,500 रुपयांच्या ई-वाहतूक चलनाचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते. सुनील यांच्या पत्नीचे म्हणणे आहे की, याच कारणामुळे पती सुनील यांनी गळफास लावून जीव दिला.
शेजाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी सुनील व्हरांड्यात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्यांनी सुनीलला वाचवले. यावेळी शेजाऱ्यांनी सुनीलला समजावले, मात्र रात्री उशिरा पत्नी संगीता आणि त्यांची मुलगी झोपी गेल्याने सुनीलने गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी संगीता हिने सांगितले की, आमच्या लग्नाला अनेक वर्षे झाली तरी मूल होत नव्हते. मूल होत नसल्याने आम्ही मुलगी दत्तक घेतली. सुनीलचे आपल्या मुलीवर खूप प्रेम होते. मात्र वाहतूक नियमाचे उल्लंघन आणि त्यामुळे झालेले चलन यामुळे सुनीलने मृत्यूला कवटाळले. या प्रकरणाची चौकशी केली जात असून आत्महत्येचे खरे कारण काय हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
























































