Movie Review : र’हास्य’मय वळणांची मेजवानी – वाळवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी पाटकर – फडके

मराठी चित्रपटांना विनोद नवीन नाही. अनेक धमाल विनोदी चित्रपट मराठीत येऊन गेले आहेत आणि तिकीटबारीवर प्रचंड लोकप्रियही झाले आहेत. वास्तविक विनोद हा खूप गंभीरतेने करण्याचा विषय आहे. कारण, त्याचा आशय, बाज, सादरीकरण हे घटक त्याचा दर्जा आणि अर्थात लोकप्रियता ठरवत असतात. विनोदासोबत अनेक विषय सहजतेने मांडता येतात. मग, ती निव्वळ करमणूक असो किंवा गंभीर सामाजिक प्रश्न. याच विनोदाचा एक कमी लोकप्रिय आणि तितकाच महाकठीण प्रकार म्हणजे डार्क कॉमेडी. एखादा भीषण, गंभीर किंवा थरारक प्रसंग आणि त्याभोवती गुंफलेला विनोद अशी धाटणी फार कमी मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. वाळवी हा अशाच एका डार्क कॉमेडीने पुरेपूर भरलेला चित्रपट आहे.

अवनी (अनिता दाते) आणि अनिकेत (स्वप्नील जोशी) या जोडप्याची ही कथा आहे. या जोडप्याच्या आयुष्यात आता पूर्वीसारखं नातं राहिलेलं नाही. त्यात अनिकेतचे देविका (शिवानी सुर्वे) नावाच्या महिलेशी विवाहबाह्य संबंध सुरू आहेत. अवनी घटस्फोट देत नसल्याने वैतागलेला अनिकेत आणि त्याची प्रेयसी देविका हे अवनीचा खून करण्याचा एक बेत आखतात. इतपत कथेची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला आधीच पाहायला मिळाली आहे. चित्रपटाची सुरुवातही अशीच होते. पण, चित्रपटाच्या शेवटापर्यंत या कथेत अनेक ट्विस्ट येतात. देविका आणि अनिकेतचा अवनीच्या खुनाचा बेत तडीला जातो की नाही, की आणखी काही वेगळं घडतं? या कथेत आणखी एक चौथं पात्र आहे, त्याची या चित्रपटात नेमकी भूमिका काय असते? वाळवी या लाकूड खाणाऱ्या किड्याचा या कथेच्या शीर्षकाशी नेमका काय संबंध आहे? हे समजून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर – 

चित्रपटाची कथा, पटकथा ही भन्नाट वळणांनी भरलेली आहे. दर काही मिनिटांनी कथेला येणारं वळण कथानकाला वेगळीच दिशा देतं. अर्थात याची वीण कुठेही सुटू नये, चित्रपट भरकटतोय असं वाटू नये, याची पुरेपूर काळजी दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी घेतली आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिजाबेथ एकादशी, चि. व चि. सौ. कां या चित्रपटांनंतर परेश यांचा हाही चित्रपट भन्नाट म्हणावा असा झाला आहे. त्याला कलाकारांनी मोलाची साथ दिली आहे. अनिता दाते, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे या चौघांनी या संपूर्ण कथेत जान आणली आहे. या चित्रपटात एकही गाणं नाही. त्यामुळे कथा खिळवून ठेवते. चित्रपटाचं छायांकनही उत्तम झालं आहे. तीच बाब संकलनाची आणि पार्श्वसंगीताची. एकूण तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट उत्तम म्हणावा असा आहे.

खूप दिवसांनी मराठी चित्रपटात एक वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. कथेचा बाज जरी थरारक असला तरी हे रहस्य कधी र’हास्य’ होऊन जातं ते प्रेक्षकांनाही कळत नाही. अतिशय गंभीर आणि थरारक घटना घडत असूनही प्रेक्षक त्यासोबतच्या विनोदात खदखदून हसतो, हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.