
आतापर्यंत 20 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ऑगस्टपासून लसींचे उत्पादन वाढेल. डिसेंबरपर्यंत 218 कोटी डोस उपलब्ध होतील. त्यामुळे डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे, असे केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या लसीकरण धोरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनसह झायडस कॅडिला, नोवावॅक्स, जेनोवा, स्पुटनिक या लसींचे देशात उत्पादन होणार आहे. तसेच परदेशातून मागविण्यात आलेल्या लसीही उपलब्ध होतील. या सर्व लसींच्या डोसमुळे डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल अशी माहिती जावडेकर यांनी दिली. हिंदुस्थानने आतापर्यंत 20 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. लसीकरणात हिंदुस्थानचा दुसरा क्रमांक आहे असे ते म्हणाले.
राहुल गांधींची पत्रकार परिषद हा ‘टुलकिट’चा भाग
जेव्हा पंतप्रधान मोदी देशाच्या जनतेसोबत कोरोनाचा सामना करत आहेत तेव्हा नौटंकी असा शब्दप्रयोग करणे गैर आहे. असा शब्द वापरून राहुल गांधींनी जनतेचा अपमान केला आहे असे जावडेकर म्हणाले. राहुल गांधींची पत्रकार परिषद ही ‘टुलकिट’च्या स्क्रिप्टचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसची निर्मिती झाली तेव्हा काँग्रेसने शंका उपस्थित केली होती. या लसबाबत संभ्रम निर्माण केला होता असे जावडेकर म्हणाले.




























































