ना रस्ता ना विलिनीकरण, वाघिवणे ग्रामस्थांची 30 वर्षापासून होतेय कुचंबणा

कित्येक वर्ष प्रशासनाकडे मागणी करूनही रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तसेच सोयीचे ठिकाण नाही म्हणून जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये गावाचे विलीनीकरण करा यासाठी 30 वर्षापासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ना रस्ता पूर्ण झाला ना  गावाचे विलीनीकरण झाले ही व्यथा आहे दापोली तालूक्यातील वाघिवणे गावाची.

वाघिवणे गावापासून वांझळोली हे गाव 5 किमी अंतर दुर आहे मात्र रस्ताच नसल्याने वाघिवणे वासियांना आपल्या वांझळोली येथील ग्राम पंचायत कार्यालयात कामानिमित्त जाण्यासाठी 23 कि.मी. लांबीच्या अंतराचा वळसा घालून जावे लागते. ग्रामपंचायतीमध्ये कामासाठी जाण्यासाठीची पायपीट थांबावी आणि गावाच्या विकासाठी प्रत्येक ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना सहभाग घेता यावा यासाठी वाघिवणे या गावापासून केवळ 2 किमी अंतर दुर अंतरावर असलेल्या इळणे ग्राम पंचायतीमध्ये वाघिवणे गाव समाविष्ट करण्यात यावे अशाप्रकारची वाघिवणे येथील ग्रामस्थांनी तालूका तसेच जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने लेखी आणि प्रत्यक्ष भेटींव्दारे मागणी केली. या मागणीला 30 वर्ष लोटली मात्र गावक-यांच्या मागणीला अजूनही यश काही आलेले नाही त्यामुळे विकासाच्या गप्पा मारणा-यां सत्ताधा-यांचा चेहरा पुरता उघड झाला आहे.

दापोली तालूक्यातील वाघिवणे हे गाव वांझळोली या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेले गाव आहे. वाघिवणे येथील ग्रामस्थांना आपल्या काही कामांसाठी वांझळोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी जंगलातून पायपीट करत 5 किमी लांब दुरचे अंतर काटून जावे लागते किंवा खाजगी वाहनाने जावयाचे झाल्यास 23 किमी अंतर काटत जावे लागते. या मार्गावर एस.टी बसची सुविधा उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनांचा उपयोग करावा लागतो यात वेळ आणि पैशांचा अपव्यव होतो. त्याशिवाय ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक उपलब्ध आहेत किंवा नाही याचा संपर्क नसल्याने अनेकदा खेप वाया जाते. आपल्या गावातील ग्रामस्थांची सोय व्हावी यासाठी येथील ग्रामस्थांनी शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर वांझळोली येथे जाण्यासाठीचा रस्ता व्हावा यासाठी तसेच वांझळोली येथे समाविष्ट असलेल्या वाघिवणे गावाचे वाघिवणे या गावापासून 2 किमी अंतरावर असलेल्या इळणे ग्रामपंचायतीमध्ये वाघिवणे गाव समाविष्ट करावे यासाठी मागणी केली आहे. मात्र गेल्या 30 वर्षापासून ग्रामस्थांनी रस्त्याची केलेली मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही तसेच विलीनीकरणाचा प्रस्तावही प्रशासनाच्या लाल फितीत अडकून पडला आहे याचा एकुणच गावातील विकासावर परिणाम झाला आहे.

शासन हे वंचित घटकाला विकासाच्या मुळ प्रक्रीयेत आणण्यासाठी येणकेन प्रकारे विविध प्रकारच्या योजना राबवित असते सध्या तर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवित आहे. मग ग्रामस्थ मागणी करत असलेल्या लोकहिताच्या मागण्या शासन का? पूर्ण करत नाही. याचे मात्र कोडे उलघडत नाही. बाकी काहीही असले तरी वाघिवणे गाव हे इळणे ग्राम पंचायतीमध्ये विलिनीकरण करावे म्हणजे विकासाच्या मुळ प्रक्रीयेत वाघिवणे गाव येईल असे वाटते.