
तालुक्यातील बावधन येथे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारून बगाड मिरवणूक काढणाऱ्या 106 लोकांची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलिसांनी शुक्रवारी 83 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांची शनिवारी जामिनावर सुटका करण्यात आली असून काल आणखी 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बावधन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश झुगारून बगाड मिरवणूक काढली होती. शुक्रवारी मिरवणूक संपताच पोलिसांनी बगाड्यासह 83 जणांना ताब्यात घेतले होते. त्या सर्वांना प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. एन. गिरवलकर यांच्यासमोर उभे केले असता, पाच हजार रुपये वैयक्तिक जामिनावर त्यांना रात्री 11 वाजता मुक्त करण्यात आले. तसेच, शनिवारी पोलिसांनी आणखी 13 जणांना ताब्यात घेतले असून, उर्वरित जणांचा शोध चालू आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री छबिन्यादिवशी मिरवणूक काढल्याने बावधनमधील भैरवनाथ पालखीच्या दहा मानकरी व वागजाईवाडी पालखीच्या चारजणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली.
























































