
मी स्वतःच्या हिमतीवर सन 1995 पासून व्यवसाय करीत आहे आणि म्हणूनच एसीबीच्या कारवाईला मी भीक घालत नाही. या कारवाई मागे कोणाचा हात आहे? हे जनतेला माहीत आहे. एसीबीने आपले काम करत राहावे, प्रसंगी आपण जेलमध्येही जायला तयार आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक म्हणाले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी कुडाळ येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना नाईक म्हणाले की, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येत्या चार-सहा महिन्यापर्यंत म्हणजेच मुंबई महानगरपालिका निवडणुकी पर्यंत राहील, नंतर ते कोसळणार असल्याचा दावा आ.नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. अल्पसंख्याक वस्तीच्या विकासासाठी कुडाळ नगरपंचायतीला प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासाठी राज्य सरकारने स्थगिती दिली आहे, याबाबत बोलताना आ.नाईक म्हणाले, नव्या सरकारने अनेक कामांना स्थगिती दिली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून स्थगिती उठविण्याची विनंती केली आहे. निश्चितच ते कुडाळ-मालवण मतदारसंघातील कामांची तसेच निधीची स्थगिती उठवतील, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर, नगरसेवक किरण शिंदे, संतोष शिरसाट, माजी नगरसेवक सचिन काळप, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.



























































