
पोलीस शिपाईने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वाकोल्याच्या कोळे कल्याण पोलीस वसाहतीत घडली. निखिल शंकर मोरे असे मृत पोलिसाचे नाव असून घडल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मोरेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
निखिल हे मरोळ येथील एल ए (4) मध्ये काम करत होते. त्यांना पाच महिन्यांचा मुलगा असून त्याची पत्नी आणि आई हे गावी राहतात. सोमवारी दुपारी निखिल याने राहत्या घरी नायलॉनच्या रस्सीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे शेजारी राहणाऱयांच्या निदर्शनास आले. त्याने याची माहिती वाकोला पोलिसांना दिली. काही वेळातच वाकोला पोलीस घटनास्थळी आले.
पोलिसांनी निखिलला उपचारासाठी सांताक्रुझच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी निखिलला मृत घोषित केले. निखिलच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी निखिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. निखिलची आई, वडील, पत्नी हे गावी असल्याने त्याचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. त्याच्या जबाबानंतर काही बाबीचा खुलासा होईल. वाकोला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.


























































