वानप्रस्थाश्रम

504

>> सुवर्णा क्षेमकल्याणी 

समाजात काही जण स्वतः अपार कष्ट करत असताना इतरांचं आयुष्य सुकर करता येईल या उद्देशाने वाटचाल करतात. कै. दादासाहेब ऊर्फ लक्ष्मण शंकर लिमये यांनीही काही वर्षांपूर्वी असाच विचार केला आणि तो ‘वानप्रस्थाश्रम’ संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारला. आयुष्यात अपार कष्ट घेणाऱ्या दादासाहेबांना त्यांच्या आईवडिलांसाठी पुरेशा संसाधनांच्या अभावामुळे आवश्यक वैद्यकीय सोयी पुरवता आल्या नाहीत यामुळे मनात ही खंत होती. त्यादरम्यान 1994 मध्ये चिखली इथे त्यांनी एक जागा विकत घेऊन 1998 साली त्यांनी आपलं स्वप्न एका उपक्रमाद्वारे साकारलं. ज्यात वृद्ध लोकांसांठी आवश्यक त्या सगळ्या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आणि या उपक्रमाला त्यांनी आपल्या गुरूंचे नाव दिले आणि ‘श्री दादा महाराज नाटेकर मोरया ट्रस्ट’ असं नामकरण झालं. या उपक्रमाचे संस्थापक लक्ष्मण शंकर लिमये यांचे 2005 साली हृदयविकाराने अकस्मात निधन झाले, परंतु त्यांनी रोवलेले रोपटे मात्र वाढत गेले आणि आज इथे अनेक उपक्रम समर्थपणे राबवले जात असून त्यात आणखी काही उपक्रमांची भर पडली. यानिमित्ताने दादासाहेबांचे पुतणे आणि संस्थेचे सध्याचे व्यवस्थापक अभय लिमये यांच्याकडून संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा आढावा …

दादासाहेब तरुण असतानाच्या काळात हिंदुस्थान हा तरुणांचा देश म्हणून संबोधला जायचा. त्यावेळी दादासाहेबांनी खूप पुढचा विचार करून वानप्रस्थाश्रम सुरू करण्याचा मानस बाळगून ते प्रत्यक्ष कृतीत आणला. इथे वयोवृद्धांसाठी (सशुल्क) सुरू केलेल्या या आश्रमाची त्यांची संकल्पना ही इतरांप्रमाणे नव्हती. ते म्हणत की, निवृत्त होऊन इथे येणाऱया वयस्कांना आपण इतरांवर अवलंबून आहोत असं दडपण कधी येता कामा नये. प्रत्येकामध्ये काही ना काही कौशल्य असतेच त्याचा वापर करून गुंतून राहणं केव्हाही उत्तम आणि म्हणूनच दादासाहेब याला वृद्धाश्रम न म्हणता वानप्रस्थाश्रम म्हणत. वृद्धत्व असलं तरी मनाने तुम्ही तरुण असता त्यामुळे आपण कोणावर अवलंबून नसून आपलीही समाजाला गरज आहे किंबहुना आपण समाजोपयोगी आहोत ही भावना दादासाहेबांनी इथे येणाऱयांमध्ये खोल रुजवली. हा एक सकारात्मक विचार समाजासाठी अतिशय पोषक ठरतोय. इथली खासियत म्हणजे सात्विक आणि शाकाहारी भोजन.owner

भविष्यात वृद्धांश्रमाची जास्त गरज भासू नये या अनुषंगाने भावी पिढीमध्ये उत्तम संस्कारांची पेरणी करण्याच्या हेतूने सशुल्क गुरुकुल पद्धतीची शाळा सुरू करण्यात आली. इथे शिकायला येणाऱया सधन कुटुंबातील विद्यार्थ्याना आजी-आजोबांसोबत वेळ घालवता यावा, त्यांची सुख दुःखं, प्रेम आपुलकी या लहानग्यांना कळावी असा यामागे उद्देश.जेणेकरून पुढे जाऊन त्यांनी आपल्या आईवडिलांना समजून घ्यावं, पर्यायाने काही वर्षांनी वृद्धाश्रमाची भर पडणार नाही. याशिवाय अजून एका संस्थेसोबत (ऑल इंडिया मूव्हमेंट फॉर सेवा) संलग्नपणे एक उपक्रम राबवला जातो जिथे गरजू, निराधार मुलांना शिक्षण दिले जाते. या संस्थेची संपूर्ण देशात अनेक ठिकाणी छात्रालयं असून गरीब मुलांचं योग्य संगोपन व्हावं, भविष्यासाठी मार्ग मिळावा यासाठी ही संस्था कार्यरत असून शिक्षण हा मूळ हेतू आहे. सध्या जवळपास 40 ते 50 गरीब, निराधार मुलांना इथे मोफत शिक्षण मिळतेय. संस्थेच्या परिसरातच इथे एका इमारतीत त्यांच्या राहण्याची सोय केली असून शिक्षणासाठी विद्यार्थी गुरुकुलमध्ये येतात. अशा रीतीने एकीकडे निवृत्त लोकांना स्वावलंबनाने जगायला प्रेरित करत भावी पिढी घडवण्याचे महत्वाचे कार्यही संस्थेमार्फत होतेय. याशिवाय गुरुकुलमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांना वेदाभ्यासाचे धडेही दिले जातात, कारण हिंदुस्थानला वेदांची परंपरा लाभली असून आपली संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीने याची सुरुवात झाली. गुरुकुलमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांना हा अभ्यास बंधनकारक असला तरीही विद्यार्थी अगदी आवडीने शिकतात.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपक्रमाच्या सुरुवातीस संस्थेच्या परिसरात एक स्विमिंग टॅंकसुद्धा उभारण्यात आला होता. कालांतराने त्याच्या देखरेखीच्या दृष्टीने तसंच पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून आता फक्त उन्हाळी शिबिरादरम्यान ते खुले ठेवण्यात येते, ज्यायोगे पोहण्याचे प्रशिक्षण इथल्या विद्यार्थ्यांना मिळू शकेल. इथला अजून एक वाखाणण्याजोगा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी ‘विज्ञानाश्रम’ या संस्थेसोबत मिळून मत्स्यशेतीचा एक उत्तम पर्याय सुरू केलाय. सध्या शेततळ्याची संकल्पना रुजतेय ज्यामुळे दुहेरी उत्पादन मिळते, शिवाय माशांच्या विष्ठेमुळे शेतीसाठी आवश्यक खतही मिळते. इथल्या स्विमिंग टॅंकचा वापर करून गेले 6 महिने संस्था मत्स्यशेती करत असून लागणारी यंत्रसामग्रीही नव्याने खरेदी न करता उपलब्ध गोष्टीतून नवनिर्मितीकडे इथे भर दिला जातो. उदा. पाण्यात हवा खेळती राहून पाण्यातले ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहावे यासाठी इथे यंत्र तयार करण्यात आलेय, तसंच माशांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात त्यांचे खाद्य मिळावे त्यासाठी टायमर मशीन बसवलेय ज्यामुळे यासाठी वेगळ्याने मनुष्यबळाची गरज लागत नाही. हे करण्यामागचा उद्देश काय असं विचारता अभय लिमये सांगतात की, सध्याच्या स्पर्धेच्या युगात केवळ नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा इतर अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्याचाही विचार होणं ही काळाची गरज आहे.

कै. दादासाहेब उर्फ श्री. लक्ष्मण शंकर लिमये यांनी सुरू केलेला हा उपक्रम खरंच स्तुत्य असून गेली अनेक वर्षे हे काम यशस्वीरीत्या सुरू आहे. इतकच नाही तर त्यात वेगवेगळ्या कल्पक उपक्रमांची भरही पडतेय ,समाजातल्या गरजू घटकांसाठी काम करून भावी समाजबांधणीसाठी दुवा होऊन काम करणारी अशी ही संस्था एक नवा आदर्श निर्माण करतेय! आपणही या संस्थेला आवर्जून भेट देऊन त्यांचे कार्य प्रत्यक्ष पाहिले तर आपल्या आयुष्यातही नक्कीच एक आशेचा स्रोत कायम तेवत राहील.

आपली प्रतिक्रिया द्या