
देशाच्या पहिल्या सेमी हायस्पीड आणि नव्या वंदे भारत रेल्वेने वेग चाचणीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या रेल्वेने अवघ्या 52 सेपंदांत ताशी 0 ते 100 किलोमीटर वेग धरत बुलेट ट्रेनलाही मागे टाकले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ही देशातील तिसरी वंदे भारत ट्रेन असून ती अहमदाबाद-मुंबई या रेल्वे मार्गावर धावणार आहे.
वंदे भारत ट्रेनविषयी माहिती देताना वैष्णव यांनी सांगितले, वंदे भारत ट्रेनची तिसरी चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. या चाचणीत रेल्वेने अवघ्या 52 सेपंदांत 0 ते 100 किलोमीटरचा वेग धरला. हा वेग गाठण्यासाठी बुलेट ट्रेनला 54.6 सेपंदांचा अवधी लागला होता. नव्या रेल्वेचा कमाल ताशी वेग 180 किलोमीटर आहे, तर जुन्या वंदे भारत रेल्वेचा कमाल वेग ताशी 160 किलोमीटर आहे.
अहमदाबादहून मुंबई केवळ 5 तासांत
नव्या वंदे भारत रेल्वेची शुक्रवारी अहमदाबाद-मुंबई दरम्यान चाचणी घेण्यात आली. ही रेल्वे अहमदाबादहून सुरतला अवघ्या 2 तास 32 मिनिटांत पोहोचली. हे अंतर कापायला शताब्दी एक्सप्रेसला तीन तासांचा कालावधी लागतो. अहमदाबादहून सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी रवाना झालेली ही रेल्वे सुरत स्थानकात सकाळी 9 वाजून 38 मिनिटांनी पोहोचली. सुरत रेल्वे स्थानकावर न थांबता ही रेल्वे मुंबई सेंट्रलला दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी पोहोचली. वंदे भारत रेल्वेने अहमदाबाद ते मुंबई हे 492 किलोमीटरचे अंतर अवघ्या 5 तास 10 मिनिटांत कापले. हेच अंतर कापायला शताब्दी एक्सप्रेसला 6 तास 20 मिनिटांचा कालावधी लागतो.
























































