
सामना ऑनलाईन । मुंबई
मार्च 2019 मध्ये होणार्या दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यास शाळांना प्रचंड तांत्रिक अडचणी येत आहेत. परीक्षा अर्ज भरण्यासाठी ‘सरल’ संगणक प्रणालीत विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक आहे. मात्र ‘सरल’मध्ये नोंद असलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच सेव्ह होत नसल्याची शाळांची तक्रार आहे. तसेच हजेरीपटावर आणि ‘सरल’वर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांची नावांची शिक्षण मंडळाकडे नोंद नसल्याचेही समोर आले आहे.
दहावीचा परीक्षा अर्ज भरण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे, मात्र बर्याच शाळांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे अद्याप विद्यार्थ्यांचे अर्ज भरून झाले नसल्याची तक्रार केली होती. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच ऑनलाइन सेव्ह होत नसून परीक्षा शुल्क चलनही तयार होत नसल्याची बर्याच शाळांची तक्रार आहे. या तक्रारींची दखल घेत शिक्षण मंडळाने अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे.
अर्ज भरण्याची मुदत वाढवली असली तरी शाळांना विभागीय मंडळाकडे परीक्षा फी भरण्याची मुदत बदललेली नसून शाळा 5 डिसेंबरपर्यंत शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळात जमा करू शकतात, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली
तांत्रिक अडचणींमुळे ‘सरल’ ऑनलाइन प्रणालीतून दहावीचा परीक्षा अर्ज भरण्याची मुदत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 16 नोव्हेंबरपर्यंच वाढवून दिली आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज सरल संगणक प्रणालीत सेव्ह होत नसल्यास 6 नोव्हेंबरपासून all application च्या लिंकवर जाऊन अर्ज भरण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने शाळांना दिल्या आहेत.























































