उठाबशांमुळे नाहक बळी गेलेल्या आशिकाच्या मृत्यूची चौकशी, हायकोर्ट रजिस्ट्रारचे पोलिसांना आदेश

शाळेत यायला उशिर झाला म्हणून पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबशा काढायला लावल्याने सहावीत शिकणाऱया आशिका या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी मुख्य न्यायमूर्तीना पत्र लिहून एका वकीलाने केली आहे. याची गंभीर दखल घेत या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, असे निर्देश हायकोर्ट रजिस्ट्रारनी मीरा-भाईंदर तसेच वसई-विरार पोलीस आयुक्त व वसई-विरार पालिकेला दिले आहेत.

सहावीत शिकणारी आशिका ऊर्फ काजल गौड हिच्यासह काही विद्यार्थी 8 नोव्हेंबर रोजी शाळेत उशिरा पोहोचली. याची शिक्षा म्हणून पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबशा काढण्यास तिला सांगण्यात आले. शाळेतून घरी आल्यानंतर आशिका हिला पाठदुखीचा त्रास होऊ लागला. जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. आरोपीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच शाळेकडूनही बचावात्मक पवित्रा घेतला जात असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी तसेच या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करत वकील स्वप्ना कोदे यांनी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांना पत्र लिहिले आहे. राज्य सरकार तसेच पोलीस महासंचालकांना या प्रकरणात नोटीस बजावण्यात यावी, त्याच बरोबर शाळा व्यवस्थापन व दोषी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेत हायकोर्ट रजिस्ट्रारने चौकशीचे निर्देश दिले आहेत. वसई-विरार आणि मिरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त तसेच वसई-विरार पालिका प्रशासनातील अधिकाऱयांनी या प्रकरणाची चौकशी करून चौकशीच्या तपशिलाची माहिती अॅड. कोदे यांना द्यावी, असे निर्देश रजिस्ट्रारनी दिले आहेत.