
पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात दिवाळीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे प्रशासनाच्या महसुलातही भर पडत आहे. गेल्या चार दिवसांत या ठिकाणी 50 हजार पर्यटकांनी भेट दिली असून 19 लाखांचा महसूल जमा झाला असल्याची माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टय़ा धम्माल मस्ती करण्यासाठी मिळाल्या असल्याने पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात अबालवृद्धांची गर्दी होत आहे. पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू असलेल्या राणी बागेत दररोज 15 ते 16 हजार पर्यटक भेट देतात. सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवार पर्यटकांची संख्या 25 हजारांच्या घरात पोहोचते. या ठिकाणी केवळ परदेशात आढळणारे नऊ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे 13 जातीचे 84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी आहेत. या शिवाय 283 प्रजातींचे आणि 6611 वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत.























































