मोटार विक्रीसाठी मे महिना ठरला घातक; वाहनांच्या विक्रीत तब्बल 99 टक्क्यांनी घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

जागतिक मंदीचा फटका सहन करीत महाराष्ट्रातील वाहन उद्योग सावरण्याचा प्रयत्न करीत असताना कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील वाहन विक्रीला मोठा फटका बसला आहे. या वर्षीचा मे महिना तर वाहन विक्रीसाठी अतिशय घातक ठरल्याचे पुढे आले आहे. मे महिन्यात संपूर्ण राज्यात केवळ 18 कमर्शिअल वाहनांची तर फक्त 52 प्रवासी वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षाच्या तुलनेत मेमध्ये वाहनांच्या नोंदणीची संख्या तब्बल 99 टक्क्यांनी घटल्याची धक्कादायक आकडेवारी राज्याच्या वित्त विभागाने दिली आहे.

लॉकडाऊनचा मोठा फटका वाहन विक्रीला बसल्याचे राज्याच्या वित्त विभागाने केलेल्या सादरीकरणात नमूद केले आहे. मार्च महिन्यात कमर्शिअल वाहनांच्या विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ झाली. मात्र एप्रिल महिन्यापासून कमर्शिअल वाहनाच्या विक्रीत सतत घसरण होत गेली. प्रवासी वाहनांच्या विक्रीत मार्च महिन्यात फक्त 5.8 टक्के घसरण होती. पण एप्रिल ते जून महिन्यात महिन्यात विक्रीत घसरण होत गेली. मागील वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात दुचाकी, तीन चाकी, कमर्शिअल व खासगी वाहनांच्या विक्रीत 22. 95 टक्क्यांनी घट झाल्याची वित्त विभागाची आकडेवारी आहे.

टू व्हीलर्सच्या विक्रीत घट
राज्यात दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण कोरोनामुळे दुचाकीच्या विक्रीलाही मोठा फटका बसला आहे. ऑगस्ट महिन्यात दुचाकीची विक्री 24. 77 टक्क्यांनी घटल्याची आकडेवारी आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात 1 लाख 11 हजार 651 दुचाकीची विक्री झाली होती. पण यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात राज्यात फक्त 84 हजार दुचाकी वाहनांची विक्री झाल्याची आकडेवारी आहे.

कमर्शिअल व्हेईकल्सची नोंदणी व टक्केवारी

जानेवारी 2020               11 हजार 450              जानेवारी 2019           11 हजार 430 (0.2 टक्के)

फेब्रुवारी 2020               9 हजार 727                फेब्रुवारी 2019           9 हजार 997 (-2.7 टक्के)

मार्च 2020                   14 हजार 937               मार्च 2019              10 हजार 458 (42.8 टक्के)

एप्रिल 2020                  1 हजार 223                एप्रिल 2019             10 हजार 408 (-88.2 टक्के)

मे 2020                      18                            मे 2019                 9 हजार 496 (-99.8 टक्के)

जून 2020                   644                         जून 2019                 7 हजार 747 (-91.7 टक्के)