मदतीसाठी कार थांबवली, चोरट्यांनी मारहाण करून गाडी पळवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

रस्त्यावर नाटकबाजी करुन मदत मागण्यासाठी गाड्यांना हात दाखवणाऱ्या चोरट्यांनी मदतीसाठी थांबलेल्या वाहन चालकाला मारहाण करुन गाडी पळवली. दिपेशसिंह हजारी (४०) असे लुटमारीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रस्त्याच्या बाजूला साथीदारापैकी एकास विव्हळत ठेवण्याचे नाटक करायला लावून चोरट्यांना हजारी यांना अडवले आणि लुटले.

नांदेड शहरात चोरट्यांनी वेगवेगळ्या शक्कल लढवून नागरिकांना लुटण्याचे काम सुरू केले आहे. मध्यंतरीच्या काळात पोलीस असल्याचा बहाणा करुन अंग झडती घेवून नागरिकांना लुटण्याचे काम काही मंडळींनी केले. हे प्रकार थांबतात न थांबतात तोच काल रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान जुनाकौठा भागात शहरातील तारासिंग मार्केटमध्ये राहणारे दिपेशसिंह हजारी हे आपल्या एमएच-१२-जीव्ही-८११८ या कारमधून जुनाकौठा मार्गे सिडकोला जात होते. त्यांची कार यशोसाई हॉस्पिटल समोर येताच रस्त्याच्या कडेला एक जण विव्हळत होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अन्य तिघं मदत मिळावी म्हणून वाहनांना हात दाखवून विनंती करत होते. त्यामुळे दिपेशसिंह हजारी यांनी आपली कार बाजूला थांबवली. त्याचवेळी चोरट्यांनी गाडीत प्रवेश करत हजारी यांना बेदम मारहाण केली व ठार मारण्याची धमकी देवून त्यांना गाडीतून खाली ढकलून दिले व त्यांची कार घेऊन पसार झाले. त्यासोबतच विव्हळत असलेला त्यांचा साथीदार देखील याच गाडीतून पसार झाला. जखमी झालेल्या हजारी यांना यशोसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस उपनिरीक्षक गजानन मोरे याबाबत सदर घटनेचा तपास करत आहेत.