
शुक्रवारी (21 ऑगस्ट) रात्री उशिरा पासून आज पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात एकूण 19 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील डॉक्टर व स्टाफ नर्स कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली आहे.
बुधवार 19 ऑगस्ट पासून वेंगुर्ला तालुक्यात कोरोना रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री पासून आज दुपारपर्यंत तालुक्यातील होडावडा गावातील 7 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे सर्वजण आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक आहेत. शिरोडा येथे एका विलगिकरण कक्षातील व्यक्तीचा तर उभादांडा कांबळीवाडी येथील गोवा वरून आलेले नवीन 4 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच पेंडूर येथील आधीच्या आढळलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील त्याच्या 2 नातेवाईकांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील राऊळवाडा येथील मुंबईहुन आलेले व विलगिकरण कक्षात असलेले नवीन दोन व्यक्ती तर आडेली येथील गोवा वरून आलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर आणि स्टाफ नर्स सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणा जास्त सतर्क झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना आरती, पूजा वगैरे घराच्या घरी करावे. गावामध्ये, वाडीमध्ये फिरणे टाळावे व ग्रामनियंत्रण समिती ने दिलेल्या सूचना चे पालन करावे असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी केले आहे.






























































