
सामना ऑनलाईन, नागपूर
सोशल मीडियातील अफवांमुळे राईनपाडा येथे पाच भटक्या विमुक्त जमातीतील निष्पाप नागरिकांचा जीव गेला. असाच खोटा प्रचार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फेक अकाऊंट काढून करत असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. त्याला धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत गौरी लंकेश यांची हत्या करणाऱयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रोल करतात असा गंभीर आरोप केला. दरम्यान या विषयावरची चर्चा दुसऱया दिवशीही अर्धवट राहिली. भाजपचे सदस्य सुरेश धस म्हणाले, भीमा-कोरेगाव घटनेपासून सोशल मीडियावरून अपप्रचार सुरू आहे. सोशल मीडियाचा गैरवापर वाढला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर मोक्कासारखा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी धस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी निधी कामदार यांनासुद्धा सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. त्यांना ट्रोल करणाऱया व्यक्ती या फेक अकाऊंटद्वारे ट्रोल करीत असल्याचे समोर आले. हा व्यक्ती राष्ट्रवादीचा असल्याचे आढळून आले आहे. यावर धनंजय मुंडे यांनी भाजपवर पलटवार केला. यावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेत ‘राईनपाडासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा सुरू असताना त्याचे राजकारण चुकीचे असल्याचे मुंडे म्हणाले.




























































