ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

426

सामना ऑनलाईन । मुंबई

दूरदर्शनवरील हॅलो इन्स्पेक्टर या मालिकेतून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झाले. मुंबई येथील एलिजाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षांचे होते. अनेक मराठी चित्रपट आणि मालिका यांमधून ते लोकप्रिय झाले होते. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाने त्रस्त होते. ज्येष्ठ संगीतकार स्नेहल भाटकर यांचे ते सुपुत्र होते. त्यांच्या पश्चात पत्नी न्यायमूर्ती मृदुला भाटकर आहेत.

तेव्हा भाटकर म्हणाले होते, शरीर साथ देईल तोपर्यंत काम करायचंय

1949 साली संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या घरी रमेश भाटकर यांचा जन्म झाला. रमेश भाटकर यांनी तीसहून अधिक मालिका आणि 50 हून अधिक नाटकांमध्ये काम केले होते. तिसरा डोळा, हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी, कमांडर या त्यांच्या गाजलेल्या मालिका. 1975मध्ये अश्रुंची झाली फुले या नाटकात त्यांनी केलेली लाल्याची भूमिका विशेष गाजली होती. 1977मध्ये चांदोबा चांदोबा भागलास का? या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अष्टविनायक या चित्रपटातही त्यांनी साहाय्यक भूमिका केली होती. त्यांचा अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांच्यासोबतचा माहेरची साडी हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला. अभिनयाखेरीज महाविद्यालयीन जीवनात त्यांनी जलतरणात विशेष प्राविण्य मिळवले होते. तसेच ते उत्तम खो-खो खेळाडूही होते.

आपली प्रतिक्रिया द्या