
प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं प्रदीर्घ आजापणामुळे निधन झालं आहे. ते 85 वर्षांचे होते.
गेल्या काही काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 5 ऑक्टोबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं.
सौमित्र चॅटर्जी हे बंगाली चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज अभिनेते होते. सौमित्र यांनी 1959 मध्ये चित्रपट ‘अपुर संसार’ मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ऑस्कर विजेते दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत सौमित्र यांनी तब्बल 14 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ते अत्यंत कसदार अभिनेते होते.
फ्रान्स या देशाकडून दिल्या जाणाऱ्या des Arts et des Lettres नावाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलेले ते पहिले हिंदुस्थानी कलाकार होते. आजवर त्यांना पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, सात फिल्मफेअर पुरस्कार, संगीत नाटक अॅकॅडमी अवॉर्ड अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.



























































