
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 17 जागांसह देशभरात 9 राज्यांमध्ये 71 जागांसाठी मतदान पार पडत आहे. राजकीय नेत्यांसह बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विक्रम गोखले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. लोकशाहीची गळचेपी होतेय असं म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी केले.
देशात सातत्याने लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे असे म्हणत लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना विक्रम गोखले यांनी चपराक लगावली. विक्रम गोखले म्हणाले, लोकशाहीची गळचेपी होत आहे असं म्हणणारे कोण आहेत? त्यांना माझ्या समोर आणून उभे करा. लोकशाहीची गळचेपी होतेय असं म्हणणाऱ्याला कानफटावले पाहिले, असं ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील 17 जागांसाठी होत असलेल्या मतदानाला लोकं भरभरून प्रतिसाद देत आहेत. अनेक ठिकाणी एक ते दीड किलोमीटरपर्यंतच्या रांगा दिसून आल्या. सोशल मीडियावरही मदतानानंतरचे फोटो अपलोड करण्याची क्रेझ असून अनेक नेते, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः मतदान करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


























































