ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा अभिनेता शंतनु मोघे आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे.

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट हिरो अशी प्रतिमा असलेले श्रीकांत मोघे यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1929 रोजी झाला. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्कर वाडी येथे तर पुढील शिक्षण सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात झालं.

शालेय जीवनातच ते नाटकांकडे वळले. श्रीकांत मोघे यांनी आजवर साठपेक्षा अधिक नाटकांमध्ये अभिनय केला आहे. तर 50 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आपल्या नाट्यप्रवासावर त्यांनी नाट्यरंगी रंगलो हे आत्मचरित्र लिहिलं आहे.

वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा ही आणि  पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

आपली प्रतिक्रिया द्या