
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी वांद्रे येथील राहत्या घरी जगाचा निरोप घेतला. ‘जगाच्या पाठीवर’, ‘सुवासिनी’, ‘मोलकरीण’ अशा अनेक मराठी चित्रपटांतील सशक्त अभिनयाने त्यांची सिनेकारकीर्द गाजली. ‘आनंद’ या हिंदी चित्रपटातील लहानशी भूमिकाही त्यांनी अविस्मरणीय केली. या सात्त्विक, शालीन सौंदर्याने सिनेरसिकांच्या मनात घर केले. गेल्या वर्षी रमेश देव आणि त्यानंतर आता सीमा देव यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मागील तीन वर्षांपासून सीमा देव या अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या आजाराने पीडित होत्या. घरातच त्यांचे कुटुंबीय त्यांची काळजी घेत होते. आज सकाळी झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती त्यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी दिली. सीमा देव यांच्या पार्थिवावर शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात अजिंक्य आणि अभिनव ही दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेत्री पूजा पवार, नेहा पेंडसे, संगीतकार अजय गोगावले, अभिनेते जावेद जाफरी, भरत जाधव, कांचन घाणेकर, सतीश रणदिवे, चिन्मयी सुमित आदींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
‘जगाच्या पाठीवर’ने दिली ओळख
सीमा देव यांचा जन्म 27 मार्च 1942 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे नाव नलिनी सराफ असे होते. चित्रपटसृष्टीत आल्यावर त्यांनी ‘सीमा’ हे नाव घेतले. मुंबईतील गिरगावात त्यांचे बालपण गेले. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. कुटुंबाचा आर्थिक गाडा नीट चालावा म्हणून त्यांनी चित्रपटात मिळेल ते काम स्वीकारण्याची तयारी केली. चित्रपटात भूमिका साकारताना लहानपणापासून शिकलेल्या नृत्याची त्यांना मदत झाली. ‘आलिया भोगासी’ हा नलिनी सराफ यांचा पहिला चित्रपट. यात रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका त्यांनी साकारली. 1965 साली ‘पडछाया’ या चित्रपटात रमेश देव यांच्या मुलीची भूमिका त्यांनी केली. पुढे ‘ग्यानबा तुकाराम’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझी आई’, ‘सुवासिनी’, ‘सोनियाची पावले’, ‘मोलकरीण’ यांसारख्या अनेक चित्रपटांत रमेश देव यांच्यासह त्यांनी भूमिका साकारल्या. ‘अपराध’ हा त्यांचा गाजलेला चित्रपट होता.
‘जगाच्या पाठीवर’ हा चित्रपट सीमा देव यांच्या अभिनय कारकीर्दीत अतिशय महत्त्वाचा ठरला. 1960 सालच्या ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या आंधळय़ा नायिकेच्या भूमिकेचे काwतुक झाले. एक सशक्त अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. राजा परांजपे यांच्या दिग्दर्शनाखाली आपल्याला खूप शिकायला मिळाले असे त्या सांगायच्या. सीमा यांच्यावर चित्रित झालेल्या ‘तुला पाहते रे तुला पाहते’ या गाण्यासह यातील सर्वच गाणी गाजली.
‘सुवासिनी’, ‘जानकी’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘या सुखांनो या’ या चित्रपटांतील सीमा यांच्या भूमिका गाजल्या. 1963 सालच्या ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा यांना मिळाला. ‘अपराध’, ‘मोलकरीण’ अशा चित्रपटांतून नकारात्मक प्रवृत्तीच्या भूमिकाही त्यांनी तेवढय़ाच ताकदीने केल्या.
हिंदी पडद्यावर साकारली चरित्र अभिनेत्री
रमेश देव यांच्याबरोबर प्रेमविवाह झाल्यानंतर सीमा या संसारातच रमल्या. पुढे मुले मोठी झाल्यावर चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी चित्रपटांमधून भूमिका करण्यास पुन्हा सुरुवात केली. ‘सर्जा’ या घरची निर्मिती असलेल्या चित्रपटात अजिंक्य देवच्या आईची भूमिका त्यांनी साकारली. चरित्र अभिनेत्री म्हणून सीमा यांना हिंदी चित्रपटांत अनेक नामवंत कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली. मीनाकुमारी, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, अनिल कपूर, गोविंदा यांसारख्या सर्व पिढीतील कलावंतांसह काम केले. ‘भाभी की चूडियाँ’, ‘आँचल’, ‘आनंद’, ‘प्रेमपत्र’, ‘मियाँ बीबी राजी’, ‘तकदीर’, ‘हथकडी’, ‘मर्द’ हे सीमा यांचे यशस्वी हिंदी चित्रपट आहेत.
चित्रपटसष्टीने मला काय दिले असा विचार करतो तेव्हा एक गोष्ट कधीही विसरता येणार नाही. या चित्रपटसृष्टीने मला एक बहीण दिली. अशी बहीण जी सदैव माझ्या पाठीशी उभी रहिली. तिचे नाव सीमा देव. सीमा देवच्या जाण्याने माझी मोठी व्यक्तिगत हानी झाली आहे. – राजदत्त, ज्येष्ठ दिग्दर्शक
सिनेसृष्टीतील सुंदर आणि अभिनयाची जाण असलेली अभिनेत्री म्हणजे सीमा देव. एक छान अभिनेत्री असे त्यांचे वर्णन मी करेन. रमेश देव यांच्यासोबतची त्यांची जोडी गाजली. त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे काही वर्षे भेट झाली नाही. आम्ही एकत्र काम केले नव्हते, पण त्या मला मोठय़ा बहिणीसारख्या होत्या. – अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते
मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान प्रेरणादायक
‘मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सोज्वळ आणि बहारदार अभिनयाने मानाचे स्थान निर्माण करणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, अशा शोकभावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, आनंद या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान युवा पिढीसाठी कायम प्रेरणादायक राहील. देव कुटुंबीयांच्या दुःखात शिवसेना परिवार सहभागी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.
वडिलांपाठोपाठ आईचे छत्र हरपले; अजिंक्य, अभिनय देव झाले भावुक
अजिंक्य देव यांनी आई सीमा देव यांच्या निधनाची माहिती दिली. ते म्हणाले, आई गेली 3-4 वर्षे अल्झायमरने ग्रस्त होती. बाबांना जाऊन आता दीड-पावणेदोन वर्षे झालीत. आईला काही आठवत नव्हते, काही कळत नव्हते, पण ती आमच्याबरोबर होती. मात्र आता आई-बाबा दोघेही नाहीयेत. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राची लाडकी जोडी
पडद्यावर सीमा देव यांची विशेष जोडी जमली ती रमेश देव यांच्याबरोबर. पुढे त्यांनी रमेश देव यांच्याबरोबर संसारदेखील थाटला. ही देव जोडी एकत्र पाहणे म्हणजे चित्रपटप्रेमींना एक पर्वणीच असायची. 2013 साली त्यांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले होते. घरी त्यांनी हा सोहळा साजरा केला होता. त्यांच्या लग्नाचे हे गोड पह्टो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.



























































