विदर्भचा शतकी विजय; कर्नाटकला नमवत गाठली उपांत्य फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात आंध्रचा 4 धावांनी पराभव, तर गतविजेत्या सौराष्ट्रला डावाने हार पत्करावी लागली. त्याचप्रमाणे आठ वेळा रणजी करंडक जिंकणाऱया कर्नाटकला हरवण्याची किमया विदर्भने केली. विदर्भने कर्नाटकसमोर विजयासाठी 371 धावांचे आव्हान ठेवले होते. काल 1 बाद 103 अशी जबरदस्त सुरुवात करणाऱया कर्नाटकचा डाव हर्ष दुबे आणि आदित्य सरवटे यांनी प्रत्येकी चार विकेट घेत 243 धावांतच संपुष्टात आणला आणि 127 धावांच्या विजयासह विदर्भने उपांत्य फेरीत धडक मारली.

काल 1 बाद 103 अशी दमदार सुरुवात असल्यामुळे कर्नाटक सामन्यात रंगत आणेल असे चित्र होते. कर्णधार मयंक अग्रवाल 70 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर त्यांच्या डावाला कोणीही सावरू शकला नाही. आदित्य सरवटेने आघाडीच्या चारही फलंदाजांना बाद करत विदर्भला विजयी ट्रकवर आणले. मग तळाच्या चारही फलंदाजांना दुबेने गुंडाळले. दुबेने 65 धावांत, तर सरवटेने 78 धावांत प्रत्येकी चार विकेटस् घेतल्या. 2017-18 आणि 2018-19 या सलग मोसमात जेतेपद जिंकणाऱया विदर्भची उपांत्य झुंज मध्य प्रदेशशी पडणार आहे. दोन वर्षांपूर्वी पाचव्यांदा विजेता ठरलेला मध्य प्रदेश सहाव्या, तर विदर्भ तिसऱया जेतेपदासाठी एकमेकांशी भिडतील.