सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
शहरातील विस्कळीत आणि अनियमित पाणीपुरवठयावरुन महापौर शोभा बोंद्रे यांनी बोलविलेल्या महानगर पालिकेच्या विशेष सभेत मंगळवारी मोठा गोंधळ उडाला. ऐन सणांमध्ये पाण्यासाठी महिला रस्त्यावर उतरु लागल्याने, शिवसेना नगरसेवक नियाज खान यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना चक्क सभागृहातच बादलीतून आणलेल्या पाण्याने अंघोळ घातली. त्यामुळे संतप्त आयुक्त अभिजित चौधरी सभागृहातुन निघून जाऊ लागल्याने, इतर आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी त्यांच्या दिशेने फाईल भिरकावल्या. त्यामुळे सभागृहात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.अखेर उपाययोजनेविनाच ही सभा झाली.
गेल्या महिनाभरापासुन शहरात अपुरा आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे.ऐन सणासुदीलाच पाण्यासाठी ठिक ठिकाणी महिला रास्ता रोको आंदोलन करु लागल्या आहेत.शहरातील बिघडलेल्या या पाणीपुरवठा व्यवस्थेवर उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी महापौर शोभा बोंद्रे यांनी विशेष सभेचे आयोजन केले आहे. सुरुवातीपासुनच शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन सर्वच नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवात केली. यावेळी जलअभियंता सुरेश कुलकर्णी हे माहिती देत असतानाच, अचानकच नगरसेवक नियाज खान यांनी त्यांच्यावर बादलीतून आणलेले पाणी ओतले. सभागृहातील या प्रकाराने आयुक्त अभिजित चौधरी हे सभागृहातून रागाने निघून जात असताना, नगरसेवकांशी त्यांच्यासोबत जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. प्रेक्षक गॅलरीतून नगरसेवक भोपळे यांनी पाण्याची घागर दाखवून प्रशासनाचा निषेध केला. तर नगरसेवक जयंत पाटील यांनी आयुक्त चौधरी यांना अशी जबाबदार झटकुन सभागृहातून जाता येणार नसल्याचे सुनावल्याने, पुन्हा या गोंधळातच सभा सुरु झाली. जयंत पाटील यांनी नगरसेवक नियाज खान यांच्या कृत्याबद्दल प्रशासनाची माफी मागितली, तर नगरसेवक अभिजित चव्हाण यांनी जलअभियंत्यासह प्रशासनाच्या या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध करत, टिचकी वाजवून सर्व अधिकाऱ्यांना सभागृहातून निघून जाण्याचा इशारा दिल्याने, सभागृहात पुन्हा तणाव निर्माण झाला. यावेळी सर्वच नगरसेवकांनी पाण्यावरुन प्रशासनाला धारेवर धरले.





























































