मुंबईच्या केळ्याचं वर्णन ऐकून पाकिस्तानी अँकर खुदूखुदू हसायला लागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या लाईव्ह कार्यक्रमात चर्चेला कधी कुठलं वळण लागेल ते सांगता येत नाही. पाकिस्तानमध्येही असाच एक प्रकार घडला आहे. एका कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान पाहुण्यांचं बोलणं ऐकून अँकरला हसणं आवरता आलं नाही. चर्चा होती पाकिस्तानच्या विकासाच्या मुद्द्याची आणि विषयांतर झालं मुंबईच्या केळ्यांवर.

या मुलाखतीची एक क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत हिने हे ट्वीट केलं आहे. या चॅनेलचं नाव न्यूज वन असं असून हा पाकिस्तानचा उर्दू चॅनल आहे. अल्वीना आगा नावाची अँकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होती. अल्वीनासमोर आलेले तज्ज्ञ हे पाकिस्तानच्या विकासाविषयी बोलत होते.

पण, बोलता बोलता त्यांनी भलतीकडेच विषय वळवला. ते म्हणाले की, इथल्या पाकिस्तानी लोकांनी थोडा खर्च करून संशोधन करायला हवं. मुंबईची केळी खूप मोठी असतात. जर एका खोलीत सहा केळी असतील तर त्याचा सुगंध दरवळत राहतो. ढाका इथली केळी देखील लांब असतात, असं ते तज्ज्ञ सांगत होते. सांगताना त्यांनी मुद्दा पटवून देण्यासाठी हातवारेही केले.

त्यांचं बोलणं ऐकून अल्वीना हिला हसणं आवरता आलं नाही. ती काही वेळ हसत राहिली. नंतर तिने हसणं रोखलं आणि तज्ज्ञाला त्याचं बोलणं पूर्ण करण्याबाबत सांगितलं. त्यावर तज्ज्ञानेही संशोधन करून केळी पिकवल्यास त्यांचा आकार आणि उत्पादन वाढेल, असं सांगितलं.

हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. काही जण अल्वीनाला अव्यावसायिक म्हणत आहेत. तर काही त्या व्हिडीओवर टिपण्णीही करत आहेत. इनायत यांनीही पाकिस्तानचे न्यूज चॅनल्स लोक मनोरंजनासाठी पाहतात, असं म्हणत तिरकस टिपण्णी केली आहे. काही नेटकऱ्यांनी इतर देशांतील केळ्यांची उदाहरणं देऊन फिरकीही घेतली आहे.